घरक्रीडाAsian Boxing Championship : अमित पांघल उपांत्य फेरीत; भारताची १५ पदके पक्की

Asian Boxing Championship : अमित पांघल उपांत्य फेरीत; भारताची १५ पदके पक्की

Subscribe

भारतीय बॉक्सर्सनी यंदाच्या आशियाई स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे.

भारताचा स्टार बॉक्सर आणि गतविजेत्या अमित पांघलने आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद (Asian Boxing Championship) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ५२ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीतील लढतीत अमितने मंगोलियाच्या खारखु एनखमांडखचा पराभव केला. तसेच अनुभवी बॉक्सर विकास कृष्णन (६९ किलो) आणि यंदा या स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या वरिंदर सिंग (६० किलो) यांनाही उपांत्य फेरी गाठण्यात यश आले. त्यामुळे या तिघांनाही किमान कांस्यपदक मिळणार हे निश्चित झाले आहे. भारतीय बॉक्सर्सनी यंदाच्या आशियाई स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. भारताला तब्बल १५ पदके मिळणार हे निश्चित झाले आहे.

मोक्याच्या क्षणी खेळ उंचावला

अमित पांघलला पदक पटकावण्यासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते. त्याला उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवण्यासाठी झुंजावे लागले. परंतु, टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या अमितने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत मंगोलियाच्या खारखु एनखमांडखला ३-२ असे पराभूत केले. आता उपांत्य फेरीत अमितपुढे कझाकस्तानच्या सकेन बिबोसीनोव्हचे आव्हान असेल.

- Advertisement -

वरिंदरला पदार्पणातच पदक

दुसरीकडे ६९ किलो वजनी गटात विकास कृष्णनने इराणच्या मोस्लेम मघसोदी माल अमीरचा ४-१ असा पराभव केला. आता उपांत्य फेरीत त्याचा सामना गतविजेत्या आणि अव्वल सीडेड बोबौस्मोन बातूरोवशी होईल. तसेच राष्ट्रीय विजेत्या वरिंदर सिंगने (६० किलो) डेला क्रूझवर मात करत उपांत्य फेरी गाठली आणि पदार्पणातच पदक पक्के केले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -