आशियाई बॉक्सिंग स्पर्धा

शिवा थापाचे विक्रमी चौथे पदक पक्के

भारताचा बॉक्सर शिवा थापाने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील आपले विक्रमी चौथे पदक पक्के केले आहे. त्याने ६० किलो वजनी गटात थायलंडच्या रुजाकर्न जुनत्रोंगचा पराभव करत या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे तो या स्पर्धेत सलग चार पदके जिंकणारा पहिला भारतीय बॉक्सर ठरला आहे. तसेच महिलांमध्ये सरिता देवीनेही उपांत्य फेरीत प्रवेश करत आपले पदक निश्चित केले आहे.

२५ वर्षीय थापाने ६० किलो वजनी गटात थायलंडच्या रुजाकर्न जुनत्रोंगचा ५-० असा पराभव केला. या सामन्यात त्याने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्याच्या पंचेसचे रुजाकर्नकडे काहीच उत्तर नव्हते. त्यामुळे त्याने हा सामना सहजपणे जिंकला. या विजयामुळे त्याने या स्पर्धेतील आपले चौथे पदक निश्चित केले आहे. त्याने २०१३ मध्ये सुवर्ण, २०१५ मध्ये कांस्य आणि २०१७ मध्ये रौप्यपदक जिंकले होते.

महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत सरिता देवीने कझाकस्तानच्या रिम्मा वोलोसेंकोवर मात केली. त्यामुळे तिने २०१० नंतर पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. मागील आशियाई स्पर्धेत रौप्यपदक मिळवणार्‍या मनिषानेही किमान कांस्यपदक निश्चित केले आहे.

पुरुषांच्या ७५ किलो वजनी गटात आशिष कुमारने किर्गिस्तानच्या ओमरबेक उलू बेहझीगीतला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली आहे. ९१ किलो वजनी गटात नमन तन्वरला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.