Australian Open : उपांत्य फेरी गाठणाऱ्या अस्लन कारात्सेवचा अनोखा विक्रम 

कारात्सेवने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ग्रिगोर दिमित्रोव्हवर मात केली.  

aslan karatsev australian open
अस्लन कारात्सेव

रशियाचा टेनिसपटू अस्लन कारात्सेवने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरी गाठताच त्याने अनोखा विक्रम आपल्या नावे केला. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये कारात्सेव त्याच्या पहिल्याच ग्रँड स्लॅम स्पर्धेत खेळत आहे. आपल्या पहिल्यावहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतच उपांत्य फेरी गाठणारा कारात्सेव हा ओपन एरामधील पहिलाच टेनिसपटू ठरला आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात १८ व्या सीडेड बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हवर २-६, ६-४, ६-१, ६-२ अशी मात केली. दिमित्रोव्हने पहिल्या सेटमध्ये आक्रमक खेळ करत हा सेट ६-२ असा जिंकला. यानंतर मात्र कारात्सेवने त्याच्या खेळात सुधारणा केली. त्याने पुढील तीन सेट ६-४, ६-१, ६-२ असे जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.

विश्वास बसत नाही

‘मी उपांत्य फेरीत प्रवेश केला, यावर विश्वास बसत नाही. ग्रँड स्लॅम स्पर्धेत खेळण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. पहिल्याच स्पर्धेत उपांत्य फेरी गाठल्याचा खूप आनंद आहे,’ असे उपांत्यपूर्व फेरीतील विजयानंतर कारात्सेव म्हणाला. कारात्सेव हा जागतिक क्रमवारीत ११४ व्या स्थानावर आहे.

जोकोविच उपांत्य फेरीत

गतविजेत्या नोवाक जोकोविचलाही उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात यश आले. अव्वल सीडेड जोकोविचने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवचा ६-७, ६-२, ६-४, ७-६ असा पराभव केला. झ्वेरेवने पहिला सेट जिंकल्यानंतर जोकोविचने दमदार पुनरागमन केले. तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये झ्वेरेवकडे अनुक्रमे ४-१ आणि ३-० अशी आघाडी होती. परंतु, यानंतर त्याचा खेळ खालावला. याचा फायदा घेत जोकोविचने सामना जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.