अतानू दासला कांस्यपदक

आशियाई तिरंदाजी स्पर्धा

अतानू दास

अतानू दासने मंगळवारी आशियाई तिरंदाजी स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. तसेच भारताला कमीतकमी तीन रौप्यपदके मिळणार हेसुद्धा निश्चित झाले आहे. मात्र, ही पदके भारताच्या खात्यात जमा होणार नाहीत. जागतिक तिरंदाजी संघटनेने काही महिन्यांपूर्वी भारतीय तिरंदाजी संघावर बंदी घातली होती. त्यामुळे भारताचे तिरंदाज आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत जागतिक तिरंदाजी ध्वजाखाली खेळत आहेत.

दासने पुरुषांच्या रिकर्व्ह वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक मिळवले. त्याने कांस्यपदकासाठी झालेल्या शूट-ऑफमध्ये कोरियाच्या जीन हायेक ओहवर ६-५ अशी मात केली. त्याआधी सोमवारी दासने रिकर्व्ह मिश्र दुहेरीत दीपिका कुमारीसोबत कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर पुरुषांच्या रिकर्व्ह सांघिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवणार्‍या संघातही दासचा समावेश होता.

दीपिका कुमारी, बोंबायला देवी आणि अंकिता भक्त या भारतीयांनी महिलांच्या रिकर्व्ह सांघिक प्रकारात जपानचा पराभव करत तिसरा क्रमांक पटकावला. तसेच भारतीय तिरंदाजांनी बुधवारी होणार्‍या तीन कॉम्पाउंड स्पर्धांची अंतिम फेरी गाठली.