घरक्रीडाचॅम्पियन्स लीग : अ‍ॅटलेटिको माद्रिदची लिव्हरपूलवर मात

चॅम्पियन्स लीग : अ‍ॅटलेटिको माद्रिदची लिव्हरपूलवर मात

Subscribe

साऊल निग्वाइझच्या गोलच्या जोरावर अ‍ॅटलेटिको माद्रिदने युएफा चॅम्पियन्स लीगच्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लेगमध्ये गतविजेत्या लिव्हरपूलवर १-० अशी मात केली. प्रशिक्षक दिएगो सिमिओने यांच्या अ‍ॅटलेटिको माद्रिद संघाच्या भक्कम बचावापुढे लिव्हरपूलचा निभाव लागला नाही. लिव्हरपूलला या सामन्यात एकही फटका गोलवर मारता आला नाही. आता लिव्हरपूलला पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी १२ मार्चला घरच्या मैदानावर होणारा या लढतीचा दुसरा लेग जिंकावा लागेल.

वांडा मेट्रोपॉलीटानो या अ‍ॅटलेटिको माद्रिदच्या मैदानावर मागील वर्षी चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना झाला होता. यात टॉटनहॅमचा पराभव करत लिव्हरपूलने ही स्पर्धा जिंकली होती. याच मैदानावर मंगळवारी रात्री झालेल्या अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्धच्या सामन्यात मात्र लिव्हरपूलला आपला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. या सामन्याच्या चौथ्या मिनिटाला अ‍ॅटलेटिकोला कॉर्नर किक मिळाली. यावर साऊल निग्वाइझने गोल करत आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर लिव्हरपूलने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या खेळाडूंनी मारलेले फटके गोलच्या वरुन गेले. त्यामुळे मध्यंतराला अ‍ॅटलेटिकोने आपली आघाडी राखली.

- Advertisement -

मध्यंतरानंतर लिव्हरपूलने अधिक आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. ५३ व्या मिनिटाला मोहम्मद सलाहला गोल करण्याची संधी मिळाली. परंतु, जो गोमेझच्या क्रॉसवर सलाहने मारलेला हेडर गोलच्या बाजूने गेला. तर ७३ व्या मिनिटाला कर्णधार जॉर्डन हँडरसनलाही गोलवर फटका मारता आली नाही. पुढे दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे अ‍ॅटलेटिकोने हा सामना १-० असा जिंकला.

हालेंडचे दोन गोल, डॉर्टमंडचा विजय

जर्मन संघ बुरुसिया डॉर्टमंडचा युवा स्ट्रायकर एर्लिंग हालेंडने आपला दमदार फॉर्म कायम राखला आहे. त्याच्या दोन गोलमुळे डॉर्टमंडने युएफा चॅम्पियन्स लीगच्या उप-उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या लेगमध्ये पॅरिस सेंट जर्मानचा २-१ असा पराभव केला. या सामन्यात मध्यंतराला गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धात मात्र सामना रंगतदार झाला. ६९ व्या मिनिटाला हालेंडने गोल करत डॉर्टमंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली, पण स्टार खेळाडू नेयमारच्या गोलमुळे पॅरिसने सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. ही बरोबरी दोन मिनिटेच राहिली. ७७ व्या मिनिटाला हालेंडने गोल करत डॉर्टमंडला हा सामना २-१ असा जिंकवून दिला. डॉर्टमंडकडून खेळताना हालेंडने आतापर्यंत ७ सामन्यांत ११ गोल केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -