घरक्रीडाहॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी: ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी: ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

Subscribe

सामन्या अखेरीस १-१ अशी बरोबरी असताना, पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताचा ३-१ ने पराभव

हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा नेदरलँडच्या ब्रेडा शहरात पार पडली. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ३-१ च्या फरकाने विजय मिळवत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. भारताने पूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी केली अगदी अखेरच्या सामन्यातही अंतिम वेळेपर्यंत १-१ अशी बरोबरी ठेवली. मात्र पेनल्टी शूटआऊट मध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीचे हे अखेरचे वर्ष असल्याने भारताने यंदातरी विजेतेपद पटकवावे, अशी भारतीय क्रीडा चाहत्यांची इच्छा होती.

भारताने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. सेमी-फायनलमध्ये नेदरलँडविरूद्धचा सामना बरोबरीत सुटला होता, मात्र गुणांच्या जोरावर भारताने अंतिम फेरीत झेप घेतली. अंतिम सामन्यातही सुरूवातीपासूनच चुरस पाहायला मिळाली. पहिल्या सत्रात दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. भारताकडून काही आक्रमणे करण्यात आली मात्र त्यात यश आले नाही. दुसऱ्या सत्रात २४ व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या गोवर्सने पेनल्टी कॉर्नरचा उपयोग करत गोल केला. त्यानंतर तिसऱ्या सत्रात भारताच्या विवेक सादर प्रसादने अप्रतिम गोल करत भारताला सामन्यात बरोबरी साधून दिली. त्यानंतर सामना संपेपर्यंत १-१ असाच स्कोर राहिला. त्यामुळे दोन्ही संघांत पेनल्टी शूटआऊट घेण्यात आले. ज्यात भारतीय खेळाडूंना काही खास कामगिरी करता आली नसल्याने भारताला ३-१ असा पराभव पत्करावा लागला.

- Advertisement -
india vs aus hocky
भारतविरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातील एक क्षण

हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचे अखेरचे वर्ष

सन १९७८ सालापासून सुरू झालेल्या हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीचे हे अखेरचे वर्ष होते. २०१९ पासून हॉकी प्रो लिग चालू होणार असल्याने हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा बंद करण्यात येत आहे. आतापर्यंत या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक १५ वेळा चषकावर आपले नाव कोरले आहे. तर भारताला एकदाही हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -