घरक्रीडाIND vs AUS : कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया फ्रंट-फूटवर - बुकानन

IND vs AUS : कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया फ्रंट-फूटवर – बुकानन

Subscribe

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेवर सर्वांचे लक्ष आहे. 

भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत सध्या बरीच चर्चा सुरु आहे. भारत-ऑस्ट्रेलियात तीन एकदिवसीय, तीन टी-२० आणि चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. खासकरून कसोटी मालिकेवर सर्वांचे विशेष लक्ष आहे. भारताने २०१८-१९ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. यंदा मात्र ऑस्ट्रेलियाचे पारडे जड मानले जात आहे. त्यातच भारताचा कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेवर जाणार असून केवळ एकच कसोटी सामना खेळणार आहे. कोहलीची अनुपस्थिती ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडू शकेल, असे विधान ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जॉन बुकानन यांनी केले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मागील कसोटी मालिकेत कोहलीने सर्वात दमदार कामगिरी केली होती. चेतेश्वर पुजाराने भारताच्या विजयात सर्वात मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली होती असे म्हणता येईल, पण मधल्या फळीत कोहलीची उपस्थिती भारताला लाभदायी ठरली होती. त्यामुळेच भारताने मागील कसोटी मालिका जिंकली होती. कोहलीमध्ये प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्याची क्षमता आहे. भारतीय संघाला मैदानावर आणि ड्रेसिंग रूममध्येही कोहलीची उणीव भासेल, असे बुकानन यांनी सांगितले.

- Advertisement -

भारताच्या खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जैव-सुरक्षित वातावरणात राहावे लागणार आहे. त्यामुळे खेळाडूंना मानसिक थकवा जाणवू शकेल आणि अशात खेळाडूंना एकत्रित ठेवण्याची कर्णधारावर मोठी जबाबदारी असणार आहे, असे बुकानन यांना वाटते. तिन्ही मालिकांमध्ये खेळणारे भारताचे खेळाडू जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ऑस्ट्रेलियात असणार आहे. त्यांना पूर्ण वेळ जैव-सुरक्षित वातावरणात राहावे लागणार आहे. हा काळ खूप मोठा आहे. अशात खेळाडूंना एकत्रित ठेवण्याची कर्णधारावर मोठी जबाबदारी असेल. त्यामुळे भारतीय संघाला मैदानाबाहेरही कोहलीची कमी जाणवेल, असे बुकानन म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -