घरक्रीडाऑस्ट्रेलियाचे आव्हान कायम

ऑस्ट्रेलियाचे आव्हान कायम

Subscribe

उस्मान ख्वाजा आणि कर्णधार अ‍ॅरॉन फिंच यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताचा ३२ धावांनी पराभव केला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांच्या या मालिकेत भारताची आघाडी १-२ अशी कमी करत आपले मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला. दुसर्‍या एकदिवसीय सामन्याप्रमाणेच या सामन्यातही ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि कर्णधार अ‍ॅरॉन फिंच यांनी चांगली सुरुवात केली. त्यांनी पहिल्या १० षटकांतच ६१ धावा करत भारतीय गोलंदाजांना बॅकफूटवर टाकले. या डावात कामचलाऊ फिरकीपटू केदार जाधव टाकत असलेल्या १७ व्या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर षटकार आणि पुढच्या चेंडूवर चौकार लगावत फिंचने आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच त्याने ऑस्ट्रेलियाच्या १०० धावाही फलकावर लावल्या. दोन षटकांनंतरच फिंचचा साथी ख्वाजानेही ५६ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. पुढेही या दोघांनी आपली चांगली फलंदाजी सुरु ठेवत २५ व्या षटकात १५० धावांची भागीदारी पूर्ण केली. या दोघांच्या आक्रमणापुढे भारतीय गोलंदाज हतबल दिसत होते. हे दोघेही शतके करणार असे वाटत असतानाच ३२ व्या षटकात चायनामन कुलदीप यादवने फिंचला ९३ धावांवर पायचीत पकडले. फिंचने या धावा ९९ चेंडूंत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने केल्या.

- Advertisement -

तसेच त्याने आणि ख्वाजाने मिळून पहिल्या विकेटसाठी १९३ धावांची भागीदारी केली. तिसर्‍या क्रमांकावर बढती मिळालेल्या ग्लेन मॅक्सवेलने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. त्याने जाडेजाच्या एकाच षटकात १ षटकार आणि २ चौकार लगावले. तर याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर १ धाव काढत ख्वाजाने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले. मात्र, १०४ धावांवर असताना त्याला शमीने बुमराहकरवी झेलबाद केले. त्याने या धावा ११३ चेंडूंत केल्या. तर मॅक्सवेलही अवघ्या ३१ चेंडूंत ४७ धावा करून माघारी परतला. पुढे कुलदीपने शॉन मार्श (७) आणि पीटर हँड्सकोम्ब (०) यांना झटपट बाद केले. यानंतर मार्कस स्टोइनिस (नाबाद ३१) आणि अ‍ॅलेक्स कॅरी (नाबाद २१) यांनी चांगली फलंदाजी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने आपल्या ५० षटकांत ५ विकेट गमावत ३१३ धावांचा डोंगर उभारला.

३१४ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. शिखर धवन (१), रोहित शर्मा (१४) आणि अंबाती रायडू (२) हे तिघे पुन्हा एकदा झटपट बाद झाल्याने भारताची ३ बाद २७ अशी धावसंख्या होती. यानंतर आपल्या घरच्या मैदानावर खेळणार्‍या महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार विराट कोहली यांनी ५९ धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. धोनीने काही चांगले फटके लागवल्यामुळे तो मोठी खेळी करणार असे वाटत होते. मात्र, झॅम्पाने २६ धावांवर त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर केदार जाधवने काही काळ कोहलीला चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. २६ धावांवर असताना केदार झॅम्पाला स्वीप करण्याच्या नादात पायचीत झाला. या डावाच्या ३५ व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर २ धावा काढत कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतील ४१ वे तर सलग दुसरे शतक साजरे केले. यानंतर मात्र फटकेबाजी करण्याच्या नादात तो १२३ धावांवर माघारी परतला.

- Advertisement -

त्याने या धावा ९५ चेंडूंत १६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने केल्या. तो बाद झाल्यावर विजय शंकर आणि रविंद्र जाडेजाने अनुक्रमे ३२ आणि २४ धावा करत भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर इतर खेळाडूंना फारसे चांगले प्रदर्शन करता आले नाही आणि भारताचा डाव २८१ धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स, जाय रिचर्डसन आणि अ‍ॅडम झॅम्पा यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.

संक्षिप्त धावफलक –

ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत ५ बाद ३१३ (उस्मान ख्वाजा १०४, अ‍ॅरॉन फिंच ९३, ग्लेन मॅक्सवेल ४७; कुलदीप यादव ३/६४, मोहम्मद शमी १/५२) विजयी वि. भारत : ४८.२ षटकांत सर्वबाद २८१ (विराट कोहली १२३, विजय शंकर ३२; पॅट कमिन्स ३/३७, जाय रिचर्डसन ३/३७, अ‍ॅडम झॅम्पा ३/७०).

कोहली सर्वात जलद ४००० धावा करणारा कर्णधार

या सामन्यात भारताच्या इतर फलंदाजांना अपयश येत असताना मागील सामन्यात शतक करणार्‍या कर्णधार विराट कोहलीने आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना चांगली झुंज दिली आहे. तसेच या खेळीदरम्यान कोहली कर्णधार म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४ हजार धावांचा टप्पा पार करणारा खेळाडू ठरला. कोहलीने अवघ्या ६३ डावांमध्ये ४००० धावांचा टप्पा गाठला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा कोहली हा १२ कर्णधार आहे. याआधी कर्णधार म्हणून सर्वात जलद ४००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी डी व्हीलियर्सच्या नावे होता. त्याने ७७ डावांमध्ये हा टप्पा गाठला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -