घरक्रीडालायनने घेतली इंग्लंडची फिरकी

लायनने घेतली इंग्लंडची फिरकी

Subscribe

ऑफस्पिनर नेथन लायनने दुसर्‍या डावात घेतलेल्या ६ विकेट्सच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडचा २५१ धावांनी पराभव केला. त्यामुळे त्यांनी ५ सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. त्यांनी २००५ नंतर पहिल्यांदा इंग्लंडमध्ये झालेल्या अ‍ॅशेस मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. तसेच २००१ नंतर पहिल्यांदा क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात एजबॅस्टन येथे झालेला सामना जिंकण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले आहे.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३९८ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना इंग्लंडची चौथ्या दिवसअखेर बिनबाद १३ अशी धावसंख्या होती. पाचव्या दिवशी पुढे खेळताना दिवसाच्या तिसर्‍याच षटकात पॅट कमिन्सने पहिल्या डावातील शतकवीर रोरी बर्न्सला ११ धावांवर बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. जेसन रॉय आणि कर्णधार जो रूट यांनी संयमाने फलंदाजी करत इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी मिळून ४१ धावांची भर घातली. मात्र, यानंतर लायनने आपली जादू चालवत रॉय (२८), जो डेंली (११), रुट (२८) आणि बेन स्टोक्स (६) यांना झटपट माघारी पाठवले.

- Advertisement -

कमिन्सने लायनला चांगली साथ देत जॉस बटलर (१) आणि जॉनी बेअरस्टो (६) यांना बाद केले. पुढे मोईन अली आणि क्रिस वोक्सने यांनी काही काळ ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना झुंज दिली. त्यांनी आठव्या विकेटसाठी ३९ धावांची भागी केल्यावर अलीला लायनने बाद करत आपल्या पाच विकेट्स पूर्ण केल्या, तर पुढच्याच चेंडूवर त्याने ब्रॉडला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अखेर वोक्सला ३७ धावांवर कमिन्सने स्मिथकरवी झेलबाद करत इंग्लंडचा डाव १४६ धावांवर संपवला आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या सामन्याच्या दोन्ही डावांत शतके करणार्‍या स्मिथला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

संक्षिप्त धावफलक –

ऑस्ट्रेलिया : २८४ आणि ७ बाद ४८७ डाव घोषित (स्मिथ १४२, वेड ११०; स्टोक्स ३/८५) विजयी वि. इंग्लंड ३७४ आणि सर्वबाद १४६ (वोक्स ३७, रॉय २८, रूट २८; लायन ६/४९, कमिन्स ४/३२).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -