शमी-सिरजच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज १८८ धावांवर गारद

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ १८८ धावांवर सर्व बाद झाला आहे. शमी आणि सिरजच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकल्याचे पाहायला मिळाले.

बॉर्डर गावसकर ट्रॉफी संपल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियात यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरूवात झाली. भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि हा निर्णय योग्य असल्याचे मोहम्मद सिराजने दाखवून दिले. त्याने दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ट्रेविस हेडला बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला.

पहिली विकेट पडल्यानंतर मिचेल मार्श आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलिया डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण कर्णधार हार्दिक पांड्याने स्मिथला (२२) बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले आणि त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर फास आवळण्यास सुरूवात केली. रवींद्र जडेजाने चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या मार्शचा अडथळा दूर केला. मार्शने ६५ चेंडूंत १० चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ८१ धावांची खेळी केली. त्यानंतर कुलदीप यादवने अनुभवी मार्नस लाबुशेन (१५) बाद केले.

ऑस्ट्रेलियाच्या ४ विकेट पडल्यानंतर जोश इंग्लिस (२६) वगळता एकही फलंदाज २० धावांचा आकडाही पार करू शकला नाही. भारताकडून मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या, रविंद्र जडेजाने २ विकेट घेतल्या. याशिवाय हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.

हेही वाचा – IPL 2023 : यावर्षी आयपीएलचे विजेतेपद कोणाकडे; सुनील गावसकरांनी केले भाकित