घरक्रीडाभारताविरुद्धची मालिका प्रेक्षकांविना होणे ऑस्ट्रेलियासाठी फायदेशीर!

भारताविरुद्धची मालिका प्रेक्षकांविना होणे ऑस्ट्रेलियासाठी फायदेशीर!

Subscribe

उस्मान ख्वाजाचे मत

भारत आणि ऑस्ट्रेलिया या जागतिक क्रिकेटमधील दोन बलाढ्य संघांतील कसोटी मालिकेकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. चार सामन्यांची ही मालिका यावर्षाच्या अखेरीस होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा रद्द होऊ शकेल किंवा लांबणीवर पडू शकेल अशी चर्चा आहे. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलिया सध्या आर्थिक संकटात सापडल्याने ते ही मालिका ठरल्याप्रमाणे व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. हे सामने रिकाम्या स्टेडियममध्ये म्हणजेच प्रेक्षकांविना खेळण्याचीही त्यांची तयारी आहे. भारताविरुद्धची मालिका प्रेक्षकांविना झाल्यास त्याचा ऑस्ट्रेलियालाच फायदा होईल, असे ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजाला वाटते.

प्रेक्षकांविना सामने होणे हे आमच्या फायद्याचे आहे. मला अजून आठवते की, भारतीय संघ मागच्या वेळी जेव्हा ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी आला होता, तेव्हा स्टेडियममध्ये बहुतांश चाहते हे भारताचे असायचे. त्यांना खूप पाठिंबा होता. खासकरुन मेलबर्नमध्ये बरेच भारतीय राहतात आणि ते सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येतात. भारतीय संघ वरचढ असताना ते चाहते प्रतिस्पर्धी संघावर अधिक दबाव आणतात. भारतात खेळताना त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणावर असणार हे तुम्हाला अपेक्षितच असते. मात्र, मेलबर्न आणि सिडनीतही ऑस्ट्रेलियापेक्षा भारताचे जास्त चाहते असतात. त्यामुळे तिथे खेळताना जरा विचित्र वाटते, असे ख्वाजा म्हणाला.

- Advertisement -

भारताचे गोलंदाज फारच उत्कृष्ट!
भारतीय संघाने मागील वर्षी ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. त्या मालिकेच्या चारही सामन्यांत उस्मान ख्वाजा खेळला होता आणि भारतीय संघाने ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला खेळ केला असे त्याने मान्य केले. तसेच तो म्हणाला, आम्ही भारताला झुंज दिली, पण चेतेश्वर पुजाराने अप्रतिम कामगिरी केली. विराट कोहलीने संघाचे चांगले नेतृत्व केले. भारताकडे फारच उत्कृष्ट गोलंदाज आहे. अशी गोलंदाजांची फळी पूर्वी भारताकडे कधीही नव्हती. त्यांनी आमच्या गोलंदाजांइतकीच चांगली कामगिरी केली. आमचे गोलंदाज अजूनही फॉर्मात आहेत. त्यातच यंदाच्या मालिकेत स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर खेळतील. त्यामुळे भारताला यंदाची मालिका जिंकण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -