घरक्रीडाIND vs ENG : अक्षर पटेलचा भेदक मारा; इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत गारद

IND vs ENG : अक्षर पटेलचा भेदक मारा; इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत गारद

Subscribe

अक्षरने घरच्या मैदानावर खेळताना आपल्या पहिल्या कसोटीत ६ विकेट घेतल्या.

डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने केलेल्या भेदक माऱ्यामुळे भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ११२ धावांमध्ये गारद झाला. स्थानिक क्रिकेटमध्ये गुजरातचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अक्षरने घरच्या मैदानावर खेळताना आपल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावातच ६ विकेट घेतल्या. त्याला ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने ३ विकेट घेत उत्तम साथ दिली. या दोघांच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ जेमतेम १०० धावांचा टप्पा पार करू शकला. इंग्लंडकडून झॅक क्रॉलीने एकाकी झुंज दिली. त्याने ८४ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ५३ धावांची खेळी केली. मात्र, त्याच्या व्यतिरिक्त इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला वीस धावांचा टप्पा पार करता आला नाही.

इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. इंग्लंडने सुरुवातीपासूनच ठराविक अंतराने विकेट गमावल्या. सलामीवीर डॉम सिबली आणि जॉनी बेअरस्टो खातेही उघडू शकले नाहीत. यानंतर क्रॉली आणि रूटने काही काळ चांगली फलंदाजी करत तिसऱ्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी रचली. मात्र, १७ धावांवर रूटला अश्विनने पायचीत पकडले.

- Advertisement -

अक्षरच्या सहा विकेट

क्रॉलीने एक बाजू लावून धरत ६८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. परंतु, ५३ धावांवर त्याला अक्षरने पायचीत पकडत इंग्लंडला आणखी एक झटका दिला. अक्षरने क्रॉलीसह बेअरस्टो, बेन स्टोक्स, बेन फोक्स, जोफ्रा आर्चर आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या विकेट घेतल्या. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ११२ धावांत संपुष्टात आला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -