Indonesia Masters 2021 : पी.व्ही सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव

भारताची स्टार बॅडमिंडनपटू पी.व्ही सिंधूचा इंडोनेशिया मास्टर्सच्या उपांत्य फेरीत पराभव झाला

बालीमध्ये सध्या सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अपेक्षेला मोठा धक्का बसला आहे. भारताची स्टार बॅडमिंडनपटू पी.व्ही सिंधूचा या स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभव झाला. शुक्रवारी झालेल्या सामन्यात सिंधूचा जपानच्या अकाने यामागुचीने सरळ सेटमध्ये पराभव केला. सिंधूच्या पराभवासोबतच यामागुचीने स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूचा जपानच्या अकाने यामागुचीविरूध्द शानदार विक्रम असताना देखील सिंधूला पराभव पत्करावा लागला. दोन्हीही खेळाडू आतापर्यंत २२ सामन्यांत आमनेसामने आले आहेत. २२ सामन्यांमधील १२ सामन्यांत सिंधूला विजय मिळवता आला होता.

यावर्षी यामागुचीविरुद्ध दोन सामने जिंकणाऱ्या सिंधूला उपांत्य फेरीत तिच्याविरुद्ध चांगली खेळी करता आली नाही.
३२ मिनिटे सुरू असलेल्या या सामन्यात जपानच्या खेळाडूने सिंधूला सरळ सेटमध्ये २१-१३, २१-९ अशा मोठ्या फरकाने पराभूत केले.

उपांत्य फेरीच्या सामन्यात तिसऱ्या मानांकित पी.व्ही सिंधूला तिच्या क्षमतेनुसार खेळी करता आली नाही. दरम्यान ती तिची सर्वोत्तम कामगिरी करण्यात देखील अपयशी ठरली. सिंधू सुरुवातीपासूनच दोन्हीही सेटमध्ये पिछाडीवर होती बदल्यात तिला पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या सेटमध्ये सिंधूला काही वेळ आघाडी मिळवता आली तेव्हा असे वाटत होते की सिंधू पुनरागमन करून प्रतिस्पर्धी यामागुचीला चांगली टक्कर देईल. मात्र असे झाले नाही दुसऱ्या सेटमध्ये देखील चांगली खेळी करून यामागुचीने २१-९ अशा अंतराने विजय मिळवला.

दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्यासोबत खेळणार यामागुची

सिंधूचा पराभव केल्याने जपानच्या यामागुचीने इंडोनेशिया मास्टर्सच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आता दुसऱ्या उपांत्यफेरीतील सामना दक्षिण कोरियाचा एन सेओंग आणि थायलंडच्या फितायापोर्न चेवान यांच्यात होणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्या खेळाडूसोबत यामागुची स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल.


हे ही वाचा: IPL 2022 : IPL च्या ३ संघांकडून विदेशी टी-२० लीगमध्ये संघांची खरेदी