महाराष्ट्र संघटनेकडून बंदी; पण दीपिका, स्नेहल भारतीय संघात

deepali joseph

दीपिका जोसेफ आणि स्नेहल शिंदे या कबड्डी खेळाडूंवर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने बंदी घातली होती. मात्र, असे असतानाही या दोघींची १ ते १० डिसेंबर या कालावधीत नेपाळ येथे होणार्‍या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या संघात निवड झाली आहे. पाटणा येथे झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला बाद फेरीही गाठता आली नाही. याउलट राष्ट्रीय स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणार्‍या महाराष्ट्राच्या पुरुष संघातील एकाही खेळाडूला भारताच्या संघात स्थान मिळाले नाही.

भारतीय हौशी कबड्डी महासंघाने राष्ट्रीय कबड्डी शिबिर संपल्यानंतर दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी दोन्ही संघांची घोषणा केली. महिलांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने खराब कामगिरी केली. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने संघाच्या या अपयशाला कारणीभूत ठरलेल्या दीपिकावर पाच वर्षांची, तर स्नेहलवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.

या निर्णयाच्या वेळी दीपिका आणि स्नेहलसोबतच बंदी घातलेल्या सायली केरिपाळेची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली होती. त्यानंतर राज्य संघटनेने बंदीसंदर्भातील पत्र भारतीय कबड्डी महासंघाला पाठवले होते. परंतु, आम्हाला महाराष्ट्र कबड्डी महासंघाकडून कोणतेही पत्र मिळाले नाही, असे भारतीय संघटनेकडून सांगण्यात येत आहे.