बांगलादेशचा भारतावर सनसनाटी विजय, ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी

भारत आणि बांगलादेश यांच्यात एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळण्यात आला. परंतु या सामन्यात बांगलादेशने भारतीय संघाचा ५ धावांनी पराभव करत सनसनाटी विजय मिळवला आहे. तसेच बांगलादेशने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे. सामन्यातील या पराभवाचा भारतीय संघाला धक्का बसला असून भारताने एकदिवसीय मालिका आपल्या हातातून गमावली आहे.

ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. त्यांनी ५० ओव्हर्समध्ये ७ गडी गमावून २७१ धावा केल्या. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने ८३ चेंडूत १०० धावांची नाबाद खेळी खेळली. तर महमुदुल्लाहने ७७ धावा केल्या. मात्र, प्रत्युत्तरात भारतीय संघ ५० ओव्हर्समध्ये ९ गडी गमावत २६६ धावाचं करू शकला. त्यामुळे भारताने ही मालिका थोडक्यासाठी आपल्या हातातून गमावली आहे.

भारतीय संघाने गोलंदाजीत शानदार सुरूवात करत बांगलादेशच्या फलंदाजांना एकापाठोपाठ बाद केले. सामन्याच्या १९ व्या ओव्हर्समध्येच बांगलादेशचे ६ गडी ६९ धावा बनवत तंबूत परतले होते. मात्र, त्यानंतर महमुदुल्लाह आणि मेहदी हसन यांनी डाव सावरत १४८ धावांची भागिदारी केली. अशा प्रकारे बांगलादेशने ७ गडी गमावत २७१ धावा काढल्या. परंतु भारतीय संघाकडून श्रेयर अय्यर (८२), अक्षर पटेल (५६) धावा काढल्या होत्या. रोहित शर्माला दुखापत झाली होती. तरीदेखील त्याने २८ चेंडूत ५१ धावा ठोकल्या. मात्र, अखेरच्या क्षणी भारतीय संघाला पराभवाचा मार्ग स्वीकारावा लागला आणि भारताने फक्त ५ धावांनी हा सामना गमावला.


हेही वाचा : IND vs BAN 2nd ODI: भारतीय संघाला मोठा धक्का, रोहित शर्मा रुग्णालयात दाखल