तो लवकरच फॉर्ममध्ये येईल.., कठीण काळात सौरव गांगुलीचा कोहलीला पाठिंबा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. कोहली वाईट परिस्थितीतून पुढे जात आहे. कारण इंग्लंडच्या दौऱ्यात विराटने एकही शतक ठोकलेलं नाहीये. मागील अडीच वर्षापासून त्याने शतक ठोकले नाहीये. त्यामुळे त्याच्या फॉर्मबाबत क्रिकेटप्रेमी आणि त्याच्या चाहत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कोहलीला पाठिंबा दिला आहे.

सौरव गांगुली यांनी याबाबत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटचे आकडे इतर खेळाडूंपेक्षा जास्त आहेत. होय, त्याच्यावर सध्या कठीण वेळ आली आहे. तो चांगल्या फॉर्ममध्ये नसल्याचं त्याला देखील माहितीये. मात्र, तो स्वतः एक महान खेळाडू आहे, हे देखील त्याला माहीत आहे. मला वाटते की, तो लवकरच फॉर्ममध्ये येईल आणि उत्कृष्ट फलंदाजी करेल, असं सौरव गांगुली म्हणाला.

कोहलीला मार्ग शोधावा लागणार आहे. तसेच त्याला यशस्वी व्हावं लागणार आहे. मला खात्री आहे की, कोहली साध्य करेल. अनेक माजी खेळाडूंनी विराट कोहलीला आता संघातून डच्चू देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी देखील विराट कोहलीचे स्टारपण न पाहता त्याला बेंचवर बसवून नव्या खेळाडूंना खेळण्यासाठी संधी द्यावी, असं मत कपिल देव यांनी व्यक्त केलं होतं.

दरम्यान, इंग्लंड आणि भारत यांच्यात एकदिवसीय सामना सुरू आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात १० विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना १४ जुलैला मँचेस्टरमध्ये होत आहे. परंतु हा सामना विराट कोहली मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा : रोहित शर्माने हिट करताच स्टेडियममध्ये बसलेल्या मुलीला लागला बॉल, व्हिडीओ व्हायरल