Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा विराट, रोहित नाही तर 'हा' खेळाडू दादाचा फेव्हरेट! 

विराट, रोहित नाही तर ‘हा’ खेळाडू दादाचा फेव्हरेट! 

गांगुली या खेळाडूचे नेहमीच कौतुक करतो. 

Related Story

- Advertisement -

भारत हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघ मानला जातो. या संघामध्ये जागतिक दर्जाच्या खेळाडूंची कमतरता नाही. परंतु, भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली नेहमीच एका खेळाडूचे कौतुक करत असतो. तो खेळाडू म्हणजे युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत. पंतला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश येत होते. मात्र, मागील काही काळात त्याच्या कामगिरीत खूप सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय या तिन्ही मालिकांमध्ये दमदार खेळ केला. कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो तिसऱ्या स्थानावर राहिला. त्यामुळे गांगुलीने पुन्हा एकदा पंतची स्तुती केली आहे.

त्याच्या कामगिरीकडे नेहमीच लक्ष

सध्याच्या भारतीय संघातील तुझा आवडता खेळाडू कोण? असा प्रश्न विचारला असता गांगुली म्हणाला, भारतीय संघातील सर्वच क्रिकेटपटू उत्तम आहेत. बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून मी एका खेळाडूचे नाव घेणे योग्य नाही. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची फलंदाजी पाहताना मला नेहमीच मजा येते. रिषभ पंतचा मी चाहता आहे. त्याच्या कामगिरीकडे माझे नेहमीच लक्ष असते. मला जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी ही तेज जोडगोळी खूप आवडते. तसेच शार्दूल ठाकूरचा खेळही मला आवडतो. तो कोणत्याही परिस्थितीला घाबरत नाही.

मी पूर्णपणे फिट

- Advertisement -

गांगुलीला यावर्षाच्या सुरुवातीला (२ जानेवारी) हृदयविकाराचा झटका झाला होता. त्यानंतर त्याला वूडलॅंड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर अँजिओप्लास्टी झाली. मात्र, आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. मी फिट असून पुन्हा कामाला सुरुवात केल्याचे गांगुली म्हणाला.

- Advertisement -