बीसीसीआयला आयपीएलच्या एका सामन्यातून मिळणार 105.5 कोटी; टीव्ही, डिजिटल हक्कांचा लिलाव

एका सामन्यातून कमाईच्या बाबतीत आयपीएलने इंग्लिश प्रीमियर लीगला (ईपीएल) मागे टाकले आहे. इंग्लंडच्या या फुटबॉल लीगची किंमत प्रति सामन्यासाठी 81 कोटी रुपये आहे. परंतु आयपीएलने त्याला मागे टाकले आहे.

आयपीएल (ipl) मीडिया राइट्स लिलावामधील दोन पॅकेजेसचा लिलाव पूर्ण झाला आहे. ई-लिलावाच्या (e auction) दुसऱ्या दिवशी सोमवारी आयपीएल टीव्ही हक्कांचा लिलाव झाला. प्रत्येक सामना 57.5 कोटींना विकला गेला आहे. त्याच वेळी डिजिटल अधिकारांचा लिलाव प्रति सामन्यासाठी 48 कोटी रुपये करण्यात आला आहे. म्हणजेच टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामने दाखवण्यासाठी बीसीसीआयला ( bcci) प्रत्येक सामन्यामागे एकूण 105.5 कोटी रुपये मिळतील. हा लिलाव पुढील पाच वर्षांच्या हक्कांसाठी आयोजित केला जात आहे. म्हणजेच बीसीसीआय 2023 ते 2027 या कालावधीतील मीडिया अधिकारांची विक्री करत आहे.

पॅकेज ए आणि पॅकेज बी या दोन श्रेणींसाठी हा लिलाव करण्यात आला आहे. या दोन श्रेणींसाठी एकूण 43,255 कोटींचे हक्क विकले गेले आहेत. पॅकेज ए ची एकूण किंमत 23,575 कोटी रुपये आहे. तर पॅकेज बी ची एकूण किंमत 19,680 कोटी रुपये आहे. पॅकेज ए भारतातील टीव्ही अधिकारांसाठी आहे तर पॅकेज बी ऑनलाइन स्ट्रीमिंग अधिकारांसाठी आहे. यामध्ये एक मनोरंजक गोष्ट अशी आहे की पॅकेज ए जिंकणारी कंपनी पॅकेज बी जिंकणाऱ्या कंपनीला एक कोटी अतिरिक्त रकमेसह आव्हान देऊ शकते.

ईपीएल मागे राहिले
एका सामन्यातून कमाईच्या बाबतीत आयपीएलने इंग्लिश प्रीमियर लीगला (ईपीएल) मागे टाकले आहे. इंग्लंडच्या या फुटबॉल लीगची किंमत प्रति सामन्यासाठी 81 कोटी रुपये आहे. परंतु आयपीएलने त्याला मागे टाकले आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीगने लिलावाच्या पहिल्याच दिवशी हा आकडा पार केला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी या रकमेवर अंतिम शिक्कामोर्तब झाले.

दोन पॅकेजेसचा लिलाव होणे बाकी 
यावेळी बीसीसीआयने लिलावाची चार पॅकेजेसमध्ये विभागणी केली आहे. पॅकेज एआणि बी चा लिलाव झाला असून आता पॅकेजसी आणि डी चा लिलाव बाकी आहे. पॅकेज सी मध्ये प्लेऑफसह लीगच्या 18 सामन्यांसाठी अन्य अधिकारांचा समावेश आहे. त्याच वेळी पॅकेज डी मध्ये भारतीय उपखंडाबाहेरील प्रसारण अधिकार समाविष्ट आहेत. सोमवारीच या दोघांचाही लिलाव होणार आहे.

आतापर्यंत स्टारकडून प्रक्षेपण 
2017 ते 2022 पर्यंत स्टार स्पोर्ट्सकडे आयपीएल मीडिया अधिकार होते. या दिग्गज कंपनीने 16 हजार कोटी रुपये मोजून हे हक्क मिळवले होते. या रकमेत त्याच्याकडे टीव्ही आणि डिजिटल दोन्ही हक्क होते. मात्र यावर्षी दोघांचा स्वतंत्रपणे लिलाव करण्यात आला आहे. स्टारचे डिजिटल प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टार आयपीएल सामने ऑनलाइन स्ट्रीम करण्यासाठी वापरले जाते.