घरक्रीडानव्या मोसमाआधी ‘कौन कितने पानी मे’ !

नव्या मोसमाआधी ‘कौन कितने पानी मे’ !

Subscribe

जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत टी-२० स्पर्धा इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १२ व्या मोसमाला शनिवारपासून (आज) सुरुवात होत आहे. या मोसमाआधी काही संघांमध्ये बरेच बदल झाले आहेत. एका संघाने आपले नाव बदलले आहे, तर एका संघाने आपल्या जर्सीचा रंग ! तर गतविजेता चेन्नई सुपर किंग्सचा संघ आपले सर्व घरचे सामने चेपॉक स्टेडियममध्ये खेळणार आहे. हे सर्व बदल तर ठीक आहेत. सर्वात महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे संघांतील खेळाडूंचा. शिखर धवनसारखा खेळाडू आता पुन्हा आपला घरचा संघ दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. तसेच विश्वचषकाआधी भारतीय खेळाडूंना सरावासाठी आणि संघातील आपले स्थान पक्केे करण्यासाठी किंवा स्थान मिळवण्यासाठी ही अखेरची संधी आहे. थोडक्यात काय तर दरवर्षीप्रमाणेच यंदाची स्पर्धाही उत्कंठावर्धक होणार आहे यात शंका नाही. मात्र, संघांमध्ये झालेल्या बदलांचा काय परिणाम होणार, तसेच कोणत्या संघांत काय चांगले आणि काय कमतरता आहे यावर टाकलेली ही एक नजर.

चेन्नई सुपर किंग्स –

भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा हा गतविजेता संघ यंदाही ही स्पर्धा जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. या संघामध्ये जुने आणि नवे अशा दोन्ही प्रकारच्या खेळाडूंचा चांगला समतोल आहे. फिक्सिंगच्या आरोपांमुळे या संघावर दोन वर्षे बंदी घालण्यात आली होती. मात्र, मागील वर्षी दमदार पुनरागमन करत त्यांनी जेतेपद पटकावले. मागील वर्षी ही स्पर्धा चेन्नई जिंकेल असे फार लोकांना वाटत नव्हते. कारण या संघात बरेच अनुभवी आणि क्रिकेटसाठी वयस्कर खेळाडू आहेत. त्यामुळे या खेळाडूंचा फिटनेस अखेरपर्यंत टिकेल का, अशी शंका होती. मात्र, धोनीसोबतच शेन वॉटसन, अंबाती रायडू, सुरेश रैना, ब्रावो यासारख्या खेळाडूंनी आपला अनुभव पणाला लावत या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यंदा या संघात फारसे बदल झालेले नाहीत. त्यांचा कर्णधारही तोच आणि प्रशिक्षकही. त्यांच्या संघात केदार जाधव, ब्रावो, मिचेल सॅन्टनर, रविंद्र जाडेजा, वॉटसन असे बरेच अष्टपैलू खेळाडू आहेत ही त्यांची जमेची बाजू. मात्र, या संघात बरेच वयस्कर खेळाडू असल्याने त्याचा परिणाम क्षेत्ररक्षणावर होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्याकडे भारतीय गोलंदाजांचीही कमतरता आहे.

- Advertisement -

जेतेपद – तीन वेळा (२०१०, २०११, २०१८)

मुंबई इंडियन्स –

तीन वेळा आयपीएल विजेता संघ मुंबई इंडियन्स यावर्षीची स्पर्धा जिंकण्याचा दावेदार आहे. या संघात अप्रतिम भारतीय खेळाडू आहेत ही त्यांच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे. मागील वर्षापर्यंत मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार याबाबत चर्चा असायची. भारतासाठी सलामीवीर म्हणून खेळणारा रोहित मुंबईसाठी मधल्या फळीत खेळतो. मात्र, काही दिवसांपूर्वी रोहितने आपण यावर्षी सलामीवीर म्हणूनच खेळणार हे स्पष्ट केले. त्यामुळे आता मधल्या फळीतील ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कायरान पोलार्ड, कृणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या यांच्यावर अधिक जबाबदारी असणार आहे. तसेच अनुभवी खेळाडू युवराज सिंगलाही मधल्या फळीत संधी मिळू शकेल. मागील मोसमात मुंबईला बरेच सामने जिंकण्याची संधी होती, पण अखेरच्या षटकांत खासकरून गोलंदाजीमध्ये त्यांना चांगले प्रदर्शन करता आले नाही. भरवशाचा जसप्रीत बुमराहही मागील वर्षी चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे मुंबईने अनुभवी लसिथ मलिंगाला ‘पुन्हा’ आपल्या संघात घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मागील वर्षी या संघात चांगला फिरकीपटू नाही असे म्हटले जात होते. मात्र, लेगस्पिनर मयांक मार्कंडेने १४ सामन्यांत १५ विकेट घेत आपल्यात प्रतिभा असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे यंदाही त्याच्यावर सार्‍यांची नजर राहणार आहे हे निश्चित.

- Advertisement -

जेतेपद – तीन वेळा (२०१३, २०१५, २०१७)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा एक असा संघ आहे ज्याला अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, क्रिस गेलसारखे खेळाडू असूनही त्यांना एकदाही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. आपल्या अव्वल ३ फलंदाजांसाठी ओळखल्या जाणार्‍या बंगळुरूने यंदा मात्र संघात काही चांगले बदल केले आहेत. त्यांनी आपली कमकुवत बाजू म्हणजेच मधली फळी आणि गोलंदाजी यांच्यात चांगले खेळाडू घेण्यावर या लिलावात अधिकाधिक भर दिला. शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, हेन्रिक क्लासन असे खेळाडू घेऊन त्यांनी आपली मधली फळी अधिक भक्कम केली आहे. तसेच उमेश यादव, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल यांना साथ देण्यासाठी त्यांनी नेथन कुल्टर-नाईल, नवदीप सैनी हे गोलंदाज आपल्या ताफ्यात घेतले आहेत. तसेच मुंबईकर अष्टपैलू शिवम दुबेवरही सार्‍यांची नजर असणार आहे. त्यांनी दुबेला ५ कोटी इतकी रक्कम देत आपल्या संघात घेतले आहे. त्यामुळे या काही बदलांमुळे तरी आपल्याला पहिले जेतेपद मिळेल अशी आशा बंगळुरू करत असेल.

जेतेपद – एकदाही नाही

सनरायजर्स हैद्राबाद –

सर्वोत्तम गोलंदाजी करणारा संघ म्हणून सनरायजर्स हैद्राबादची ओळख आहे. भुवनेश्वर कुमार आणि राशिद खान या दोन अप्रतिम गोलंदाजांसोबतच सिद्धार्थ कौल, खलील अहमद, संदीप शर्मा आणि बासिल थंपी हे चांगले गोलंदाजही आहेत. तसेच मागील वर्षी बंदी घातलेल्या डेविड वॉर्नरचे संघात पुनरागमन होत आहे. त्याचबरोबर शिखर धवनच्या ऐवजी त्यांना दिल्ली संघाकडून अष्टपैलू विजय शंकरही मिळाला आहे. त्यामुळे सनरायजर्सचा संघ अधिकच मजबूत झाला आहे. मात्र, या संघाच्या फलंदाजांना मागील काही आयपीएलमध्ये अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे शाकिब-अल-हसन, युसूफ पठाण आणि दीपक हुडा यांच्याकडून त्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

जेतेपद – दोनदा (डेक्कन चार्जर्स नाव असताना २००९) (२०१६)

राजस्थान रॉयल्स –

सर्वात पहिला मोसम जिंकणार्‍या राजस्थानवरही चेन्नईप्रमाणेच बंदी घालण्यात आली होती. मात्र, मागील वर्षी त्यांना पुनरागमनात चांगले प्रदर्शन करता आले नाही. त्यातच प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथवरही बंदी घालण्यात आली होती. त्यांनी मागील वर्षी बाद फेरी गाठली होती. मात्र, पहिल्याच सामन्यात त्यांचा कोलकाताने पराभव केला. यंदा मात्र त्यांना यापेक्षा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. त्यासाठी जॉस बटलर, बेन स्टोक्स, जॉफ्रा आर्चर यांना दमदार प्रदर्शन करणे गरजेचे आहे. तसेच कर्णधार अजिंक्य रहाणेला जर विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवायचे असेल तर या स्पर्धेत चांगला खेळ करणे गरजेचे आहे. त्यामुळे तोही यंदा चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. मात्र, त्यांच्या गोलंदाजीवर अजूनही प्रश्नचिन्ह आहेत. जयदेव उनाडकटला त्यांनी पुन्हा मोठ्या रक्कमेत खरेदी केले. मात्र, राजस्थानला या स्पर्धेत चांगली कामगिरी करायची असल्यास उनाडकटला मागील वर्षीपेक्षा यंदा चांगली गोलंदाजी करावी लागेल.

जेतेपद – एकदा (२००८)

किंग्स इलेव्हन पंजाब –

किंग्स इलेव्हन पंजाब मागील वर्षी मोठ्या लिलावात बरेच नवे खेळाडू घेतले. यामध्ये रविचंद्रन अश्विन, लोकेश राहुल, क्रिस गेल, मयांक अगरवाल, मुजीब उर रहमान या खेळाडूंचा समावेश होता. अश्विनला त्यांनी कर्णधार म्हणून निवडले. मात्र, मागील वर्षी त्यांना सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. यंदाच्या लिलावात त्यांनी पुन्हा नवे खेळाडू घेण्यावर भर दिला. त्यांनी वरूण चक्रवर्ती या ‘मिस्ट्री’ फिरकीपटूला ८ कोटी ४० लाखांत केले खरेदी केले. त्यामुळे तो या मोसमात कशी कामगिरी करतो याकडे सार्‍यांचे लक्ष असणार आहे. तसेच मोहम्मद शमी, प्रभसिमरन सिंग, सॅम करन, सर्फराज खान या खेळाडूंनाही पंजाबने मोठी किंमत देऊन आपल्या संघाचा भाग बनवले. तसेच यंदा त्यांनी न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेन्सन यांना आपला प्रशिक्षक बनवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूझीलंडने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे पंजाबला यंदाची स्पर्धा जिंकण्याचे प्रबळ दावेदार मानले जात नसले तरी त्यांच्यात चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे.

जेतेपद – एकदाही नाही

कोलकाता नाईट रायडर्स –

या संघाने मागील आयपीएलमध्ये सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात त्यांनी १४ पैकी ८ साखळी सामने जिंकत बाद फेरीत प्रवेश केला आणि बाद फेरीत त्यांनी राजस्थानचा पराभव केला होता. मात्र, क्वालिफायरमध्ये त्यांचा हैद्राबादने पराभव केला. यंदा कोलकाताने संघात फार बदल केलेले नाहीत. त्यांनी विंडीजचा अष्टपैलू कार्लोस ब्रेथवेट आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लोकी फर्ग्युसनला आपल्या संघात घेतले आहे. या संघामध्ये क्रिस लिन, सुनील नरीन, आंद्रे रसेल असे आक्रमक परदेशी खेळाडू आहेत. मात्र, त्यांचे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत ही त्यांची कमकुवत बाजू आहे. मात्र, कार्तिक, रॉबिन उथप्पा, नितीश राणा, शुभमन गिल असे दमदार भारतीय खेळाडू त्यांच्या संघात आहेत. तसेच ईडन गार्डन्सच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर त्यांच्याकडे कुलदीप यादव, नरीन आणि पियुष चावला असे चांगले फिरकीपटूही आहेत. मात्र, त्यांना कमलेश नागरकोटी आणि शिवम मावी या दोन युवा वेगवान गोलदांजांची कमी भासू शकेल. हे दोघे दुखापतीमुळे यंदा खेळू शकणार नाहीत.

जेतेपद – दोनदा (२०१२, २०१४)

दिल्ली कॅपिटल्स –

मागील वर्षीचा दिल्ली डेअरडेविल्स यंदा दिल्ली कॅपिटल्स म्हणून ओळखला जाईल. दिल्ली या संघात मागील काही वर्षे अनेक बदल झाले आहेत. यंदाही त्यांनी हे सुरू ठेवत सलामीवीर शिखर धवनला आपल्या संघाचा भाग बनवले. सहा वर्षे हैद्राबादकडून खेळल्यानंतर धवन पुन्हा दिल्लीकडून खेळणार आहे. आयपीएलच्या पहिल्या मोसमात तो दिल्लीकडून खेळला होता. त्याच्या समावेशाने दिल्लीची फलंदाजी मजबूत झाली आहे. दिल्लीकडे शिखरसोबतच पृथ्वी शॉ, कर्णधार श्रेयस अय्यर, रिषभ पंत असे तगडे फलंदाज आहेत. अय्यर, पंत हे दोघे चांगल्या फॉर्मातही आहेत. हीच त्यांची जमेची बाजू आहे. तसेच संदीप लामिचानेच्या रूपात त्यांच्याकडे चांगला फिरकीपटू आहे. मात्र, त्यांच्याकडे भारतीय गोलंदाजीचे फारसे पर्याय नाहीत. इशांत शर्मा हा एकमेव अनुभवी भारतीय गोलंदाज त्यांच्याकडे उपलब्ध आहे. इशांतलाही टी-२० क्रिकेटमध्ये फारसे यश मिळालेले नाही. ही दिल्लीची कमकुवत बाजू आहे. त्यामुळे दिल्लीला या स्पर्धेत चांगली कामगिरी करायची असल्यास कागिसो रबाडा आणि ट्रेंट बोल्ट या परदेशी गोलदांजाना चांगले प्रदर्शन करावे लागणार आहे.

जेतेपद – एकदाही नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -