घरक्रीडासौरभदा का जबाब नही!

सौरभदा का जबाब नही!

Subscribe

बंगाल टायगर, महाराजा, खडूस आणि यशवंत कर्णधार अशा विविध विशेषणांनी क्रिकेट जगतात मशहूर असणार्‍या सौरभ गांगुलीची बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी निवड झाली. भारतीय क्रिकेटसाठी हे शुभवर्तमान. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी कसोटीपटूची निवड होण्याचा योग विरळच. महाराजकुमार विझीनगरम यांचा अपवाद वगळता भारतीय कसोटी कर्णधाराची अध्यक्षपदी निवड होण्याची ही केवळ दुसरी खेप. लोढा आयोगाच्या शिफारसीनंतरही शहा, ठाकूर प्रभृतींचे सगेसोयरे गांगुलीसोबत नव्या बीसीसीआय कार्यकारीणीत ठाण मांडून बसले आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या जमान्यात महाराजांंचे वर्चस्व होते. त्यानंतर ‘धनिक’ मंडळींनी ताबा घेतला. त्यांच्यापाठोपाठ राजकारण्यांची वर्णी लागली. गांगुलीने बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवले असून दालमियांपाठोपाठ बीसीसीआयचे अध्यक्षपद त्याला लाभले हादेखील एक योगायोगच.

खमका कर्णधार अशी गांगुलीची क्रिकेट जगतातील प्रतिमा. मॅच-फिक्सिंगच्या प्रकरणानंतर त्याने भारतीय क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची धुरा समर्थपणे वाहिली. भारतीय क्रिकेट कर्णधाराचा काटेरी मुकूट धारण करणार्‍या गांगुलीने स्टीव वॉच्या ऑस्ट्रेलियन संघाचा विजयी अश्वमेध रोखला. ईडन गार्डन्स, चेपॉकच्या खेळपट्टीवर सनसनाटी विजय मिळवून २००१ मधील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गांगुलीने हस्तगत केली ती राहुल द्रविड, लक्ष्मण, हरभजन या त्रिकुटाच्या दैदीप्यमान कामगिरीमुळे. चेपॉकवरील सचिनच्या रौप्यमहोत्सवी कसोटी शतकाचाही हातभार लागला. स्टीव वॉसारख्या खडूस कर्णधाराचा नक्षा उतरविला तो गांगुलीच्या ‘जैसे को तैसा मिलेगा’ या वृत्तीमुळे!

- Advertisement -

पाकिस्तानला पाकिस्तानातच खडे चारण्याची भूमिका समर्थपणे वठवली ती गांगुलीनेच. तब्बल ५ दशकांनंतर प्रथमच पाकिस्तानात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला तो गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या सेहवाग, द्रविड, तेंडुलकर प्रभृतींच्या भारतीय संघाने. २००४ मधील या उत्तुंग कामगिरीनंतर गांगुली कर्णधारपदाच्या कामगिरीला ग्रहण लागले. चॅपल गुरुजींच्या आगमनाने त्याची लय बिघडली. कर्णधारपदाची कवच कुंंडले उतरल्यावर त्याची कसोटी कारकीर्दही संपुष्टात आली.

निवृत्तीनंतर स्वस्थ बसणे गांगुलीला शक्य नव्हते. प्रशासकीय बाबींमध्ये दिलचस्पी राखणार्‍या गांगुलीला दालमियांचा वरदहस्त लाभला. बंगाल क्रिकेट असोसिएनमध्ये संयुक्त चिटणीसपद भूषवणार्‍या गांगुलीची अध्यक्षपदी निवड झाली ती जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर. लोढा समितीच्या शिफारसींमुळे बीसीसीआयचा कारभार प्रशासकीय समितीच्या हाती सोपवण्यात आला. गेल्या ३३ महिन्यांच्या कालावधीत पुलाखालुन बरेच पाणी वाहून गेले. समन्वयाच्या अभावामुळे बीसीसीआयची प्रतिमा उजळण्याऐवजी अधिकच मलिन होत गेली.

- Advertisement -

विराट कोहलीचा भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये २४० गुणांसह अव्वल स्थानावर आहे. कसोटी क्रिकेटची रुची वाढवण्यासाठी कर्णधार कोहली, तसेच बीसीसीआयचे नूतन अध्यक्ष सौरभ गांगुली प्रयत्नशील आहेत. इंग्लंड, ऑस्ट्रेलियाप्रमाणे पारंपरिक कसोटी केंद्रावरच भारतातही कसोटी सामने खेळले जावेत असे मत कर्णधार कोहलीने मांडले. कसोटी क्रिकेटमधील दिलचस्पी वाढवण्यासाठी गांगुलीचा नवनवीन प्रयोग करण्याचा मानस आहे. भारतातही (ईडन गार्डन्स) विद्युतझोतात कसोटी सामने खेळवण्याचा त्याचा इरादा असून पिंकबॉल क्रिकेट खेळण्यासाठी कर्णधार विराट कोहलीदेखील तयार झाल्याचे त्याने सांगितले.

२२-२६ नोव्हेंबरदरम्यान होणार्‍या पाहुण्या बांगलादेशविरुद्धचा कसोटी सामना विद्युतझोतात खेळला जातो का याकडे तमाम क्रिकेट शौकिनांचे लक्ष असेल. गांगुलीच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत विद्युतझोतात ईडन गार्डन्सवर पिंकबॉल कसोटी सामना खेळला गेल्यास बंगाल क्रिकेट असोसिएशन, तसेच गांगुलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाईल. अनेक नवनवीन कल्पना राबवणार्‍या बंगाल क्रिकेट असोसिएशनला भारतातील पहिल्यावहिल्या डे-नाईट क्रिकेट कसोटी सामन्याच्या आयोजनाचा मान लाभेल. यानंतर भारतात कसोटी सामना तब्बल वर्षभराने (डिसेंबर २०२०-जानेवारी २०२१) खेळला जाईल. गांगुलीची बीसीसीआय अध्यक्षपदाची कारकीर्द जेमतेम १० महिन्यांची (जुलै २०२०) असून यादरम्यान अनेक क्रांतीकारक बदल घडवण्याचा त्याचा मानस आहे.

बीसीसीआय अध्यक्षपदी विराजमान झालेल्या गांगुलीकडून अनेक अपेक्षा आहेत. त्याचा माजी सहकारी लक्ष्मणने बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे नूतनीकरण करण्याची सूचना गांगुलीला केली. राष्ट्रीयक्रिकेट अकादमी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ व्हावे अशी इच्छा लक्ष्मणने बोलून दाखवली. द्रविड, लक्ष्मण, तेंडुलकर, सेहवाग, झहीर खान या आपल्या माजी सहकार्‍यांचा भारतीय क्रिकेटच्या विकासात सहभाग असावा असे गांगुलीला वाटते. ‘कॉन्फिल्ट ऑफ इंटरेस्ट’च्या जाचक कलमामध्ये बदल झाल्याविना माजी कसोटीपटू सहभागी होणार नाहीत अशी दादाची धारणा असून माजी कसोटीपटूंनी विनामोबदला सेवा करावी हे त्याला पटण्यासारखे नाही. गांगुलीने मात्र समालोचक, स्तंभलेखक यांना सोडचिठ्ठी देत अध्यक्षपद भूषवण्यास पसंती दिली. परंतु, आपल्याप्रमाणे इतरही खेळाडू असे करतील ही धारणा योग्य नाही असे गांगुलीला वाटते.

स्वच्छ, पारदर्शी कारभाराची हमी देणार्‍या गांगुलीने कसोटीपटूंप्रमाणेच प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंच्या वेतनात, निवृत्ती वेतनात वाढ करण्यात यावी, तसेच अधिक सोयी-सुविधा देण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली. विविध राज्य क्रिकेट असोसिएशन्सना जादा आर्थिक सहाय्य करण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्याने मांडले. उपाध्यक्ष महिम वर्मा, संयुक्त चिटणीस जयेश जॉर्ज, चिटणीस जय शहा (गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव), खजिनदार अरुणसिंग धुमल (भाजप नेते अनुराग ठाकूर यांचे बंधु) या आपल्या तरुण सहकार्‍यांबरोबर बीसीसीआयचा कारभार सुलभपणे पार पाडता येईल अशी खात्री गांगुलीला वाटते. घोडामैदान जवळच असून पुढे काय होते ते बघायचे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -