Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा 'भारतरत्न' बलबीर! 

‘भारतरत्न’ बलबीर! 

ऑलिम्पिकमध्ये भारताला तीन वेळा सुवर्णपदक मिळवून देणारे महान हॉकीपटू बलबीर सिंग सिनियर यांचे मागील सोमवारी निधन झाले. बलबीर हे १९४८ (लंडन), १९५२ (हेलसिंकी) आणि १९५६ (मेलबर्न) असे सलग तीन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचा भाग होते. त्यांच्या मार्गदर्शनात भारताने १९७५ मध्ये हॉकी विश्वचषक पहिल्यांदा जिंकला. भारतीय हॉकीला त्यांचे योगदान खूप मोठे आहेत. असं असतानाही त्यांना व ध्यानचंद यांना 'भारतरत्न' न मिळाल्याची रसिकांना खंत आहे. क्रीडाप्रेमींच्या मनात मात्र ते भारतरत्नच आहेत, राहतील! बलबीर सिंग यांना विनम्र आदरांजली.  

Related Story

- Advertisement -

एखादा क्षण माणसाच्या आयुष्यात येतो आणि त्याचं भागध्येय त्याला मिळतं. काय करायचंय ते ठरून जातं. त्या दिशेनं त्याची वाटचाल सुरू होते. एका मुलाच्या आयुष्यात बाराव्या वर्षीच असा क्षण आला. त्याचं ध्येय ठरलं. एका चित्रपटगृहात! बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारताने लागोपाठ तिसऱ्यांदा हॉकीचं सुवर्णपदक मिळवलं. तेही  हिटलरच्याच संघाला ८-१ अशी धूळ चारून. या अंतिम सामन्याचं चित्रणही लेनी रिफेनश्टाल यांनी त्यांच्या ‘ऑलिम्पिआ’ या चित्रपटात समाविष्ट केलं होतं. त्या मुलानं लाहोरमध्ये तो चित्रपट पाहिला आणि ठरवलं आपण हॉकीपटू व्हायचं. ध्यानचंदसारखं!

हा निश्चय, हे ध्येय त्यानं पुरं केलं. तेही ध्यानचंद यांच्याप्रमाणे ऑलिम्पिकमध्ये तीन हॉकी सुवर्णपदकं मिळवून! योगायोग असा की ध्यानचंदप्रमाणे तोही तिसऱ्या सुवर्ण विजेत्या संघाचा कर्णधार होता. तो मुलगा होता बलबीर सिंग दोसांज. ठरवल्यानुसार तो हॉकी खेळू लागला. ध्यानचंदप्रमाणेच सेंटर फॉरवर्ड म्हणून खेळून या खेळातप्राविण्य मिळवत होता. ध्यानचंदप्रमाणेच त्याचा खेळ कौशल्यपूर्ण, कलात्मक होता. हरबेल सिंग या प्रशिक्षकाची नजर बलबीर सिंगच्या खेळावर गेली. त्याची गुणवत्ता ओळखून त्यांनी त्याला अमृतसरला खालसा कॉलेजला यावे असा आग्रह केला. त्यानुसार बलबीर (जन्म : १० ऑक्टोबर १९२४; हरिपूर, खालसा. पंजाब प्रांत) अमृतसरला खालसा कॉलेजला गेला १९४२ मध्ये.

- Advertisement -

हरबेल सिंग यांच्या देखरेखीखाली त्याचा सराव सुरु झाला. खालसा हे हॉकीसाठी आदर्श कॉलेज. तेथे हॉकीची चार मैदानं होती. बलबीरनं पंजाब विद्यपीठाला लागोपाठ तीनदा (१९४३, ४४, ४५) आंतर विद्यापीठ विजेतेपद मिळवून दिलं. तसंच पंजाबचे विभाजन होण्याआधी १९४७ मध्ये पंजाबला राष्ट्रीय विजेतेपद मिळवून दिलं. पण फाळणीची चाहूल लागताच तो कुटुंबासह लाहोरहून लुधियानाला आला.

हॉकीतील कौशल्यामुळे बलबीरची निवड १९४८ च्या लंडन ऑलिम्पिकसाठी झाली. बारा वर्षांनंतर होणाऱ्या या ऑलिम्पिकमध्ये भारताचा लौकिक कायम राखण्याची जबाबदारी या संघावर होती. ती त्याने व्यवस्थित पार पाडली. बलबीरला दुसऱ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्याने तेव्हा अर्जेंटिनाविरुद्ध उत्कृष्ट खेळ केला. पदार्पणाच्या या सामन्यात त्याने हॅटट्रिक करून भारताच्या ९-१ विजयात मोठा वाटा उचलला. पण नंतर त्याला वगळण्याचे बेत सुरू झाले. त्यावेळी एका रसिकाने भारताचे तेथील राजदूत व्ही. के. कृष्णमेनन यांच्या कानावर हे घातले. त्यांच्यामुळेच बलबीर यांचे संघातील स्थान कायम राहिले.

- Advertisement -

या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतासमोर आव्हान होते ते ब्रिटनचे. ऑलिम्पिकमध्ये हे संघ प्रथमच समोरासमोर होते. बलबीरच्या दोन गोलमुळे वर्षापूर्वीच्या राज्यकर्त्यांच्या संघावर भारताने ४-० विजय मिळविला. ऑलिम्पिकमध्ये प्रथमच तिरंगा फडकला. सर्वांचे डोळे पाणावले. स्वतंत्र भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक.

बलबीरच्या खेळाचं मोल सर्वांना कळलं होतं. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकला जाणाऱ्या संघाचे उपकर्णधारपद त्यालाच मिळाले. कर्णधार होते के. डी. सिंग उर्फ ‘बाबू’. त्यावेळी बलबीरला भारताचा ध्वजधारक बनण्याचा मानही मिळाला. उपांत्य फेरीतील ब्रिटनविरुद्धच्या ३-१ अशा विजयात त्याचीच हॅटट्रिक होती. अंतिम सामन्यात भारताची गाठ पडली ती हॉलंडशी. बलबीरच्या ५ गोलच्या जोरावर भारतानं त्यांना ६-१ असं नमवलं. बलबीरचे ५ गोल हा अंतिम सामन्यातील हा विक्रमच समजला जातो.

मात्र हा थोडा वादाचा विषय आहे. कारण ध्यानचंद यांनी त्यांचे आत्मचरित्र ‘गोल’मध्ये म्हटले आहे की, “बर्लिन ऑलिम्पिकमधील यजमान संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात आम्ही ८-१  विजय नोंदला. त्यात मी सहा गोल केले.”  सराव सामन्यात जर्मनीने भारताला हरविले होते. त्यामुळे या विजयाचं मोल मोठं होतं. तो दिवस होता १५ ऑगस्ट. बारा वर्षांनी त्याच तारखेला भारताला स्वातंत्र्य मिळालं!

१९५६ मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये भारताचं नेतृत्व बलबीरने केलं. त्यानं पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध ५ गोल केले. पण त्या सामन्यात त्याचं बोट फ्रॅक्चर झालं होतं. त्यामुळे नंतरच्या सामन्यात रणधीरसिंग जेंटलने नेतृत्व केलं. परंतु, उपांत्य आणि अंतिम सामन्यात बलबीर बोट फ्रॅक्चर व प्लॅस्टरमध्ये असताना खेळला. अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानवर १-० मात केली. आधीच्या दोन ऑलिम्पिकमध्ये प्रभाव पाडता आला नाही, यापेक्षा दोन्ही वेळा भारतानं सुवर्णपदक जिंकलं याची बोच पाकिस्तानला होती. त्यांनी खूप सराव केला होता, म्हणूनच ते अंतिम फेरीत पोहोचले. या प्रतिस्पर्धी संघांतील काही खेळाडू पूर्वी एकमेकांसोबत खेळले होते. त्यामुळे खेळतांना काहीसं विचित्रच वाटत होतं, असं बलबीरनं नंतर सांगितलं.

अंतिम सामना भारतानं १-० असा जिंकत विजयाची हॅटट्रिक केली. बलबीरला ध्येयपूर्तीचं समाधान मिळालं. मुख्य म्हणजे ध्यानचंदप्रमाणे यावेळी तो भारताचा कर्णधार होता. यानंतर त्याची प्रशिक्षक म्हणून कारकीर्द सुरू झाली. टोकियो ऑलिम्पिकनंतर भारतीय संघाची घसरण सुरू झाली. पण १९७१ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने कांस्यपदक मिळवले, तेव्हा बलबीरच प्रशिक्षक होते. नंतरच्या वर्षी बर्लिन ऑलिम्पिकमध्ये मात्र भारत फिका पडला. दुसऱ्या १९७५ च्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळी बलबीर यांच्यावर प्रशिक्षक-व्यवस्थापक अशी दुहेरी जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी ती समर्थपणे पार पाडली. त्यांच्या मार्गदर्शनात भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला.

हॉकीतील अद्वितीय कामगिरीसाठी त्यांना १९५७ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले. डोमिनिकन रिपब्लिकने १९५८ मध्ये मेलबर्न ऑलिम्पिकची टपाल तिकिटे काढली . त्यात एकावर बलबीर आणि गुरुदेवसिंग  यांचे छायाचित्र होते. त्यांना आणखी एक बहुमान १९८२ च्या दिल्ली एशियाडच्या वेळी मिळाला. स्टेडियममधील क्रीडाज्योत त्यावेळी बलबीरच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. त्याच वर्षी एका मतदानात शतकातला सर्वोत्तम खेळाडू म्हणून बलबीर सिंगची निवड करण्यात आली होती. आधुनिक ऑलिम्पिक १८९६ मध्ये सुरू झाले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने १९१२ च्या लंडन ऑलिम्पिकच्या वेळी प्रारंभापासूनच्या सर्वोत्तम सोळा क्रीडापटूंची निवड केली होती. त्यात बलबीर सिंगचा समावेश होता.

कृतार्थ जीवन ते जगले. मात्रत्यांना व ध्यानचंद यांना ‘भारतरत्न’ न मिळाल्याची रसिकांना खंत आहे. कदाचित हॉकीमध्ये पैसा आणि प्रसिद्धीचा झगमगाट नसेल, म्हणूनही ही रत्ने दुर्लक्षित झाली असावीत. क्रीडाप्रेमींच्या मनात मात्र ते भारतरत्नच आहेत, राहतील! बलबीर सिंग यांना विनम्र आदरांजली!

- Advertisement -