घरक्रीडाBhavani Devi : थोडी खुशी, थोडा गम!

Bhavani Devi : थोडी खुशी, थोडा गम!

Subscribe

तलवारबाज भवानी देवीसाठी सोमवारचा दिवस खूप आनंद देणारा आणि काहीसा निराश करणारा ठरला.

थोडी खुशी, थोडा गम, अशा शब्दांत भारताची तलवारबाज भवानी देवीच्या ऑलिम्पिक पदार्पणाचे वर्णन करावे लागेल. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिलीवहिली तलवारबाज भवानी देवीसाठी सोमवारचा दिवस खूप आनंद देणारा आणि काहीसा निराश करणारा ठरला असे म्हणायला हरकत नाही. ऑलिम्पिक तलवारबाजी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी ती भारताची पहिलीच खेळाडू ठरली. पहिल्याच प्रयत्नात तिला पहिला विजयही साजरा करण्याची संधी मिळाली. परंतु, दुसर्‍या फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पदक पटकावण्याचे तिचे स्वप्न अधुरे राहिले. मात्र, मुळात इथपर्यंत पोहोचणे हीच भवानी देवीसाठी आणि भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

सोमवारी ऑलिम्पिक पदार्पणात तलवारबाज भवानी देवीने ट्युनिशियाच्या नादिया बेन अजिजीचा १५-३ असा सहज पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली. तिने केवळ सहा मिनिटे आणि १४ सेकंदांमध्ये हा सामना जिंकण्याची दमदार कामगिरी केली. परंतु, दुसर्‍या फेरीत तिची गाठ पडली, ती जागतिक क्रमवारीतील तिसर्‍या स्थानावर असलेल्या मॅनन ब्रुनेटची! भवानी देवीला हा सामना जिंकण्यासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागणार होता. परंतु, त्यात तिला यश आले नाही. ब्रुनेटने हा सामना १५-७ अशा मोठ्या फरकाने जिंकल्याने भवानी देवीचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले.

- Advertisement -

तिच्या या ऑलिम्पिकपर्यंतच्या प्रवासाची सुरुवात ही १७ वर्षांपूर्वी वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी झाली. चेन्नईची रहिवासी असलेल्या भवानी देवीने शाळेत केवळ एका उपक्रमाचा भाग म्हणून तलवारबाजी शिकण्यास सुरुवात केली. परंतु, तिच्यात चांगली तलवारबाज होण्याची प्रतिभा असल्याचे प्रशिक्षकांना तिला बघता क्षणीच कळले होते. सुरुवातीच्या काळात तिला बांबूने सराव करावा लागत होता. मुलींच्या शाळेच्या ४० सदस्यीय संघात भवानी देवीचा समावेश होता. परंतु, तलवारबाजी हा खेळ भारतात फारसा लोकप्रिय नाही. व्यावसायिक पातळीवर हा खेळ खेळण्याचा फार लोक विचार करत नाहीत. त्यामुळे कालांतराने शाळेच्या तलवारबाजी संघातील ४० पैकी ३९ मुलींनी दुसर्‍या खेळावर किंवा अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि भवानी देवीच्या रूपात केवळ एक सदस्य या संघात शिल्लक राहिला.

मुलींनी हा खेळ खेळणे सुरक्षित आहे का? असा प्रश्न अनेकदा विचारला गेला. परंतु, त्याने काय फरक पडतो, तू लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको, असे तिला आईने सांगितले. भवानीने हार न मानता आईच्या पाठिंब्यामुळे तलवारबाजी सुरु ठेवली. पुढे जाऊन तिला केरळ येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात सराव करण्याची संधी मिळाली. या संधीचा तिने पुरेपूर फायदा करून घेतला. वयाच्या १४ व्या वर्षी तुर्की येथे झालेल्या स्पर्धेत तिने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही.

- Advertisement -

२०१७ मध्ये महिलांच्या वर्ल्डकप तलवारबाजी स्पर्धेत भवानी देवीने सुवर्णपदकाची कमाई केली आणि ही कामगिरी करणारी ती भारताची पहिलीच खेळाडू ठरली. आता ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी पहिली खेळाडू ठरण्याचा मानही तिने मिळवला आहे. भवानी देवीच्या या कामगिरीतून अनेक युवकांना प्रेरणा मिळेल आणि ते तलवारबाजीकडे वळण्याचा विचार करतील, हे निश्चित.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -