घरक्रीडाबुमराह जायबंदी

बुमराह जायबंदी

Subscribe

द.आफ्रिका मालिकेला मुकणार

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार आहे. त्याच्या जागी भारताच्या निवड समितीने उमेश यादवला संघात स्थान दिले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ सामन्यांची कसोटी मालिका होणार असून या मालिकेतील पहिला सामना २ ऑक्टोबरपासून विशाखापट्टणम येथे होईल.

नियमित तपासणीच्या वेळी बुमराहला दुखापत असल्याचे आढळले. आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत बुमराहवर बीसीसीआयचे डॉक्टर उपचार करतील. अखिल भारतीय सिनियर निवड समितीने बुमराहच्या जागी उमेश यादवची संघात निवड केली आहे, असे बीसीसीआयने त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले.

- Advertisement -

बुमराह या मालिकेत खेळू न शकणे हा भारतासाठी मोठा धक्का आहे. बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत १२ कसोटी सामन्यांत १९.२४ च्या सरासरीने ६२ बळी घेतले आहेत. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या २ सामन्यांत त्याने १३ विकेट्स पटकावल्या होत्या, ज्यात हॅटट्रिकचाही समावेश होता. बुमराह हा ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजमध्ये एका कसोटी सामन्याच्या एका डावात ५ बळी घेणारा पहिला आशियाई गोलंदाज आहे. मात्र, त्याने अजून भारतात एकही कसोटी सामना खेळलेला नाही. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१८ मध्ये आपला अखेरचा कसोटी सामना खेळणार्‍या उमेश यादवने आतापर्यंत ४१ सामन्यांत ११९ गडी बाद केले आहेत. त्याला मागील काही काळात सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना २ ऑक्टोबरपासून विशाखापट्टणम येथे, दुसरा सामना १० ऑक्टोबरपासून पुणे येथे आणि तिसरा सामना १९ ऑक्टोबरपासून रांची येथे होणार आहे.

- Advertisement -

भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, शुभमन गिल, उमेश यादव.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -