घरक्रीडाबायर्नची डॉर्टमंडवर मात

बायर्नची डॉर्टमंडवर मात

Subscribe

 बुंडसलिगा फुटबॉल स्पर्धा

जॉशवा किमीचने केलेल्या गोलच्या जोरावर बायर्न म्युनिक संघाने जर्मनीतील फुटबॉल स्पर्धा बुंडसलिगाच्या सामन्यात बुरुसिया डॉर्टमंडवर १-० अशी मात केली. हा बायर्नचा मागील १४ सामन्यांतील तेरावा विजय होता. मागील सलग सात वर्षे ही स्पर्धा जिंकणारा बायर्न संघ आता ६४ गुणांसह गुणतक्त्यात अव्वल स्थानी असून डॉर्टमंडचा संघ ५७ गुणांसह दुसर्‍या स्थानी आहे. या स्पर्धेचे आता केवळ सहा सामने शिल्लक असल्याने बायर्न सलग आठव्यांदा जेतेपद पटकावणार हे जवळपास निश्चितच आहे.

या सामन्याआधी पहिल्या स्थानी असलेल्या बायर्न आणि दुसर्‍या स्थानी असलेल्या डॉर्टमंडमध्ये केवळ एका गुणाचा फरक होता. त्यामुळे डॉर्टमंडच्या मैदानावर झालेल्या या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र, दोन्ही संघांना आपला सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आले. पूर्वार्धात दोन्ही संघांच्या बचाव फळींनी चांगला खेळ केला. त्यामुळे दोन्ही संघांना गोल करण्याच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत. मात्र, सामन्याच्या ४३ व्या मिनिटाला किमीचने अप्रतिम गोल करत बायर्नला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात डॉर्टमंडने स्टार खेळाडू जेडन सँचोला मैदानात उतरवले. परंतु, त्यालाही फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे बायर्नने हा सामना १-० असा जिंकत या मोसमातील विसावा विजय प्राप्त केला.

- Advertisement -

फ्रँकफर्ट-फ्रायबर्ग सामन्यात बरोबरी

फ्रँकफर्ट आणि फ्रायबर्ग यांच्यातील बुंडसलिगाचा सामना ३-३ असा बरोबरीत संपला. फ्रँकफर्टकडून आंद्रे सिल्वा, दैची कामाडा आणि टिमोथी चॅन्डलर यांनी गोल केला. तर फ्रायबर्गचे गोल विन्सेंझो ग्रिफो, नील्स पीटरसन आणि ल्युकास होलर यांनी केले. दुसरीकडे वोल्फ्सबर्गने बायर लेव्हरकुसेनचा ४-१ असा धुव्वा उडवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -