घरक्रीडाबायर्नला सलग आठव्यांदा जेतेपद

बायर्नला सलग आठव्यांदा जेतेपद

Subscribe

बुंडसलिगा फुटबॉल स्पर्धा

बायर्न म्युनिक हा जर्मन फुटबॉलमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय संघ म्हणून ओळखला जातो. त्यांनी वर्षानुवर्षे जर्मनीतील स्थानिक स्पर्धांमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून मंगळवारी त्यांनी सलग आठव्यांदा बुंडसलिगा फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. बुंडसलिगा ही जर्मन फुटबॉलमधील सर्वात महत्त्वाची स्पर्धा जिंकण्याची बायर्नची तब्बल तिसावी वेळ होती. मंगळवारी रात्री झालेल्या सामन्यात त्यांनी वेर्डर ब्रेमन संघाचा १-० असा पराभव केला.

या सामन्याच्या पूर्वार्धात ब्रेमनच्या बचावफळीने चांगला खेळ केला. त्यामुळे बायर्नला गोल करण्याच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत. परंतु, मध्यंतराला दोन मिनिटे शिल्लक असताना स्टार स्ट्रायकर रॉबर्ट लेव्हनडोस्की अप्रतिम वॉली मारून गोल करत बायर्नला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात बायर्नच्या अल्फान्सो डेव्हिसला रेड कार्ड मिळाले. त्यामुळे त्यांना अखेरची ११ मिनिटे दहा खेळाडूंसह खेळावे लागले. परंतु, त्यानंतरही बायर्नने आपली आघाडी अखेरपर्यंत राखत हा सामना १-० असा जिंकत सलग आठव्यांदा बुंडसलिगाचे जेतेपद पटकावले. मागील चार मोसम बुंडसलिगामध्ये सर्वाधिक गोल करणार्‍या लेव्हनडोस्कीचा हा यंदाच्या मोसमातील तब्बल ३१ वा गोल होता.

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा दोन महिने बंद होती. परंतु, याचा बायर्न आणि लेव्हनडोस्कीच्या खेळावर जराही परिणाम झाला नाही. पुन्हा जर्मनीतील फुटबॉल स्पर्धा सुरू झाल्यावर बायर्नने सलग आठ सामने जिंकण्याचा पराक्रम केला. प्रशिक्षक हांसी फ्लिक यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा जिंकण्याची बायर्नची पहिलीच वेळ होती. फ्लिक यांनी २०१४ फिफा विश्वचषक विजेत्या जर्मनी संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -