बीडब्ल्यूएफला खेळाडूंची पर्वा नाही; बॅडमिंटनपटूंची टीका

करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. करोनामुळे आतापर्यंत जवळपास ५००० जणांनी आपले प्राण गमावले आहेत. या विषाणूचा फटका खेळांनाही बसला आहे. अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, असे असतानाही जागतिक बॅडमिंटन फेडरेशन (बीडब्ल्यूएफ) आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द करण्याचा विचार करत नाही आणि ही गोष्ट बॅडमिंटनपटूंना अजिबातच आवडलेली नाही. बीडब्ल्यूएफला खेळाडूंची पर्वा नाही, अशी टीका जगभरातील बॅडमिंटनपटू करत आहेत. भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप तसेच डेन्मार्कच्या हान्स-क्रिस्टियन विटींगहॉसने सोशल मीडियावरून आपली चिंता व्यक्त केली आहे.

मला खरचंकळत नाही. एटीपी टूर ६ आठवडे बंद ठेवण्यात येणार आहे, एनबीएने सर्व सामने स्थगित केले आहेत, विविध देशांतील फुटबॉल स्पर्धांचे सामने पुढे ढकलण्यात आले आहेत, युरोपमधील आईस हॉकी स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, बॅडमिंटनच्या सर्व स्पर्धा सुरु आहेत. प्रत्येक देश काहीतरी काळजी घेत आहे, पण आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये खबरदारी म्हणून आम्ही फक्त हस्तांदोलन करणे बंद केले आहे. सध्या सुरु असलेल्या ऑल इंग्लंड स्पर्धेत तर प्रत्येक दिवशी शंभरहून अधिक लोकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जात आहे.

या सर्व गोष्टींचे मला आश्चर्य वाटते. माझे बॅडमिंटनवर प्रेम आहे, पणसध्या खेळापेक्षा खेळाडू, प्रशिक्षक आणि इतरांची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी बीडब्ल्यूएफ आणि इतर फेडरेशनना सांगू इच्छितो की, त्यांनी या विचित्र परिस्थितीत सर्व बॅडमिंटन स्पर्धा रद्द कराव्यात, असे विटींगहॉसने आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले.

विटींगहॉसची ही पोस्ट सायना, श्रीकांत, कश्यप, प्रणॉय, स्पेनचे राष्ट्रीय प्रशिक्षक फर्नांडो रिवास यांनी रिट्विट करत आपली सहमती दर्शवली. मलाही कळत नाही, असे सायनाने म्हटले. मी विटींगहॉसशी सहमत आहे. बीडब्ल्यूएफने खेळाडूंचा विचार केला पाहिजे, असे श्रीकांतने आपल्या ट्विटमध्ये लिहिले. बीडब्ल्यूएफ, कृपया जागे व्हा!, असे ट्विट कश्यपने केले.

सर्व बॅडमिंटन स्पर्धा रद्द करा!
सर्व बॅडमिंटन रद्द झाल्या पाहिजेत. निर्णय आमच्या (खेळाडूंच्या) हातातनाही, आम्हाला सूचनांप्रमाणे वागावे लागते. बीडब्ल्यूएफने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. ते निर्णय घेण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर सोडू शकत नाहीत, असे मत पारुपल्ली कश्यपने व्यक्त केले. तसेच बीडब्ल्यूएफवर टीका करताना तो म्हणाला, बीडब्ल्यूएफ सर्व स्पर्धा रद्द करण्यासाठी इतका वेळ का लावत आहे, हे मला कळत नाही. ते बहुदा एखाद्या खेळाडूला करोनाची लागण होण्याची वाट पाहत आहेत.