घरक्रीडाकर्णधार कोहली अजूनही शिकतोय!

कर्णधार कोहली अजूनही शिकतोय!

Subscribe

रवी शास्त्रींचे उद्गार

भारताचा कर्णधार विराट कोहली क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत अफलातून कामगिरी करत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. मात्र, विराटची गणना केवळ सर्वोत्तम फलंदाजांमध्येच नाही, तर सर्वोत्तम कर्णधारांमध्येही होते. तो कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने ५३ पैकी ३३ कसोटी सामने जिंकले आहेत. तसेच मागील काही वर्षांपासून विराटचा संघ आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. मात्र, तो कर्णधार असताना भारतीय संघाला आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यामुळे त्याच्यावर काही प्रमाणात टीका होत आहे. परंतु, विराटच्या नेतृत्वात भारत जागतिक स्पर्धा जिंकेल असा प्रशिक्षक रवी शास्त्री यांना विश्वास आहे. तसेच विराट कर्णधार म्हणून अजूनही शिकत आहे, असेही त्यांनी सांगितले.

मी आजपर्यंत परिपूर्ण कर्णधार पाहिलेला नाही. प्रत्येक कर्णधाराचे काही कच्चे दुवे असतात आणि काही जमेच्या बाजू असतात. विराट काही बाबतीत सर्वोत्तम आहे, तर काही बाबतीत इतर एखादा कर्णधार त्याच्याहून वरचढ असेल. मात्र, तुम्हाला काय निकाल मिळतो, हे सर्वात महत्त्वाचे असते. तो आपल्या जमेच्या बाजूंचा कसा उपयोग करतो आणि प्रतिस्पर्ध्याला कसा अडचणीत टाकतो, हे आपण पाहणे गरजेचे आहे. कर्णधार म्हणून विराट अजूनही शिकत आहे. त्याच्यात सामन्यागणिक सुधारणा होत आहे. त्याच्याइतका जिद्दीने आणि उत्साहाने खेळणारा कर्णधार मी पाहिलेला नाही. डावपेच आखण्याच्या बाबतीत त्याच्यात अजून सुधारणा होत आहे. प्रत्येक कर्णधार वेगवेगळ्या परिस्थितीतून शिकत असतो. परंतु, विराटची आतापर्यंतची कामगिरी फारच उत्कृष्ट आहे, असे शास्त्री म्हणाले.

- Advertisement -

शास्त्री हे आपल्या आक्रमक शैलीसाठी आणि वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना बर्‍याचदा टीकेला सामोरे जावे लागते. याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, यात काही नवे नाही. २०१४ पासून मी या संघासोबत आहे आणि तेव्हापासूनच माझ्याबाबत काहीतरी बोलले जाते. आपल्या देशात लोकांचे क्रिकेटवर विशेष प्रेम आहे आणि आपल्या संघाने सर्व सामने जिंकावेत असे त्यांना वाटते. त्यामुळे ते विविध प्रकारे व्यक्त होतात.

कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये रस!
सध्याचे खेळाडू कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवत एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटला प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक रस आहे, असे प्रशिक्षक शास्त्री यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी पुढे सांगितले, विराटसारख्या खेळाडूने कसोटी क्रिकेटला पसंती देणे ही केवळ भारतीय क्रिकेटसाठीच नाही, तर जागतिक क्रिकेटसाठी आनंदाची गोष्ट आहे. कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत राहण्याचे त्याचे लक्ष्य आहे. त्याच्याकडे पाहून भारतच नाही, तर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका यांसारख्या देशांतील युवकांना कसोटी क्रिकेटचे आकर्षण वाटेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -