चहर आऊट, सैनी इन!

दुखापतीमुळे दीपक तिसर्‍या वनडेला मुकणार

सैनी

भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसर्‍या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्याला पाठीच्या दुखापतीमुळे मुकावे लागणार आहे. त्याच्या जागी दिल्लीकर वेगवान गोलंदाज नवदीप सैनीची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी असून तिसरा सामना रविवारी कटक येथे होणार आहे.

विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यादरम्यान दीपकची पाठ दुखावली. बीसीसीआयच्या डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि त्याला काही काळ विश्रांतीचा सल्ला दिला. त्यामुळे तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात खेळू शकणार नाही, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले.

भारत आणि वेस्ट इंडिजमधील दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी पार पडला. हा सामना भारताने १०७ धावांनी जिंकत मालिकेत बरोबरी केली. या सामन्यात चहरला एकही विकेट मिळवता आली नाही, तर पहिल्या सामन्यात त्याने ४८ धावांच्या मोबदल्यात १ विकेट घेतली होती. त्याच्या जागी संघात निवड झालेल्या नवदीप सैनीने आतापर्यंत ५ टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, पण त्याने अजून एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. मात्र, ४७ स्थानिक एकदिवसीय सामन्यांत ७५ विकेट्स त्याच्या नावे आहेत.