नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा उपांत्य फेरीचा सामना मंगळवारी (4 मार्च) दुबईमध्ये खेळला जात आहे. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळला जात असून यामधील एक योगायोग समोर आल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आयसीसी स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. चाहत्यांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2015 च्या एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरीचा योगायोग समोर आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टीव्ह स्मिथच्या उपस्थितीमुळे हा योगायोग सर्वांसमोर आला. (Champions Trophy 2025 coincidence of 2015 ODI World Cup Semi Final)
हेही वाचा : KKR Captain 2025 : कोलकाता संघाचा कर्णधार ठरला, शाहरुखने मराठमोळ्या खेळाडूकडे दिले नेतृत्व
2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत आणि 2015च्या एकदिवसीय विश्वचषकात एक आश्चर्यकारक साम्य आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी आणि न्यूझीलंडचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. 2015 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकातही उपांत्य फेरीतील संघांची रचना अशीच होती. त्यानंतर पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 5 विकेट्स गमावत 281 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने 4 विकेट्स राखून विजय मिळवला होता.
दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाशी लढत झाली होती. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 328 धावांचा डोंगर रचला होता. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने फक्त 233 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने हा सामना 95 धावांनी जिंकला. या सामन्यात स्टीव्ह स्मिथने शतक झळकावले होते. तसेच, स्टीव्ह स्मिथ यावेळी संघाचा कर्णधार होता. विशेष म्हणजे, 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही होते. पण यावेळी लाईनअप थोडा वेगळा होता. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला, तर दक्षिण आफ्रिकेचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला होता. भारताने न्यूझीलंडला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभूत केले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला होता. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताला हरवून विश्वचषक जिंकला होता.
असेही काही योगायोग
विराट कोहलीने 2015 च्या ODI विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शतकही झळकावले होते. या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शतकही झळकावले. तसेच, 2015 च्या विश्वचषकापूर्वी 2015 च्या आयपीएलमध्ये केकेआर विजेता ठरला होता. यावेळीही गेल्या वर्षीचा आयपीएल विजेता केकेआर आहे. तसेच, 2014 च्या आयपीएलमध्येही केकेआरने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू जॉर्ज बेलीच्या नेतृत्वात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा पराभव केला होता. 2024च्या आयपीएलमध्ये, केकेआरने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या संघ सन रायझर्स हैद्राबाद संघाचा पराभव केला.