(Champions Trophy 2025) इस्लामाबाद : सध्या चर्चा आहे ती, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आणि पाकिस्तानच्या यजमानपदाची. पाकिस्तानसाठी ही स्पर्धा आता केवळ उरकल्यासारखी ठरली आहे. एकूण 19 दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेतील पाकिस्तानचे आव्हान अवघ्या सहा दिवसांत संपुष्टात आले. तर, देशातील सामने केवळ 15 दिवसच झाले. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि इंग्लंड हे संघ उपांत्य फेरीपू्र्वीच बाद झाले. एकही सामना न जिंकलेल्या पाकिस्तानी संघाच्या खात्यात पावसामुळे एक गुण जमा झाला. पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर बांगलादेशबरोबर पाकिस्तानला प्रत्येकी एक गुण मिळाला. (Host Pakistan’s challenge ended in just six days)
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. 1996मध्ये पाकिस्तानने आयसीसीच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. म्हणजे, 29 वर्षांनंतर पाकिस्तानला आयसीसीच्या स्पर्धेचे यजमानपद मिळाले. तथापि, पाकिस्तान क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या संधीचे सोने करू शकले नाही. ज्या इव्हेंटसाठी पाकिस्तानने आपले स्टेडियम तयार केले, त्यात स्पर्धेत अंतिम सामनाही खेळवला जाणार नाही. एवढेच नव्हे तर, यजमान पाकिस्तान अंतिम सामन्यातही नाही.
हेही वाचा – Cricket Match : पाकिस्तानचे अजबच… तीन बॉलमध्ये चार विकेट, मिळाली हॅट्-ट्रीक, नेमके काय घडले?
पाकिस्तानने आयोजित केलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची सुरुवात 19 फेब्रुवारी रोजी झाली आणि अंतिम सामना 9 मार्च रोजी होणार आहे. अशा प्रकारे ही स्पर्धा एकूण 19 दिवसांची आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे असले तरी भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने हायब्रिड मॉडेलअंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. म्हणजेच, भारताचे सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जात आहेत. तर उर्वरित सामने पाकिस्तानात होत आहेत. पाकिस्तानी संघ 24 फेब्रुवारी रोजी, म्हणजेच अवघ्या सहाव्या दिवशी स्पर्धेतून बाहेर पडला. तर पाकिस्तानमधील स्पर्धा 15व्या दिवशीच संपली. या स्पर्धेचा पाकिस्तानमधील शेवटचा सामना 5 मार्च रोजी खेळवण्यात आला होता.
स्पर्धेचा शेवटचा सामना म्हणजेच अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. कारण हा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड दरम्यान रंगणार आहे. अशा रीतीने, स्पर्धा संपण्यापूर्वीच पाकिस्तानसाठी या स्पर्धेचे आयोजन देखील संपले आहे. तथापि, पाकिस्तान अजूनही अधिकृतपणे या स्पर्धेचे यजमानच आहे.
हेही वाचा – Champions Trophy : स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक छटकार मारणारे टॉप 5 खेळाडू