नवी दिल्ली : गेल्या काही काळापासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आयोजनावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी हायब्रिड मॉडेलला मान्यता दिल्यानंतर आता स्पर्धेसाठी तटस्थ ठिकाण निवडण्यात आले आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेसाठी दुबई ही जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, या जागेसाठी पाकिस्तानला कोणतीही अडचण नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) दुबई हेच स्थान निश्चित व्हावे अशी इच्छा होती. याबाबत आता आयसीसी लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. (Champions trophy 2025 ICC finalized venue soon to announce)
हेही वाचा : Jammu and Kashmir Weather : काश्मीरात 50 वर्षानंतर हाडं गोठवणारी थंडी, दल सरोवराचा पृष्ठभागही गोठला
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा 19 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होणार आहे. यावर्षीचे यजमानपद हे पाकिस्तानकडे सोपवण्यात आले होते. त्यामुळे गेल्या काही काळापासून भारतीय संघासह अनेक आंतरराष्ट्रीय संघांनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दर्शवला होता. पण ही स्पर्धा पाकिस्तानातच व्हावी, यावर पीसीबी अडून बसले होते. तसेच, हायब्रीड मॉडेललादेखील त्यांनी विरोध केला होता. पण, नुकतेच त्यांनी हायब्रीड मॉडेलला सहमती दर्शवली होती. समोर आलेल्या वेळापत्रकानुसार, 19 फेब्रुवारीला कराचीमध्ये स्पर्धेची सुरुवात होणार असून यावेळी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना होणार आहे. तसेच, 20 फेब्रुवारीला भारतीय संघ हा बांगलादेशविरोधात पहिला सामना खेळेल. तर, 23 फेब्रुवारीला भारत पाकिस्तान यांच्यात भिडत होणार असल्याचे समोर आले आहे.
आयसीसीने यापूर्वीच जाहीर केले आहे की, आयसीसी इव्हेंटमधील सर्व भारत-पाकिस्तान सामने 2027 पर्यंत तटस्थ ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत. समोर आलेल्या माहितनुसार, 2024-2027 च्या अधिकार चक्र दरम्यान आयसीसी इव्हेंट्समध्ये दोन्ही देशांनी आयोजित केलेले भारत आणि पाकिस्तान सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जाणार आहेत. तसेच, फेब्रुवारी आणि मार्च 2025 मध्ये खेळल्या जाणाऱ्या आगामी आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (यजमानपद – पाकिस्तान) तसेच आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 ( यजमानपद – भारत) आणि आयसीसी पुरुषांच्या टी 20 विश्वचषकाला लागू होणार असल्याचे याआधीच आयसीसीने स्पष्ट केले आहे.