नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीवरून वाद सुरू आहेत. एकीकडे पीसीबी हे चॅम्पियन्स ट्रॉफी ही पाकिस्तानमध्ये खेळवण्यावर आग्रही आहेत. तर, दुसरीकडे बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर (ICC) अडचणी वाढल्या होत्या. तसेच, काही दिवसांपूवी पीसीबीने हायब्रिड मॉडेल स्वीकारणार नसल्याचे आयसीसीला कळवले होते. पण नुकतेच समोर आलेल्या माहितीनुसार, आयसीसीकडून या स्पर्धेसाठी एक हायब्रिड मॉडेलचा प्रस्तावित तयार केला असल्याचे सांगण्यात आले आहे. (Champions Trophy 2025 ICC likely to propose Hybrid Model)
हायब्रिड मॉडेल म्हणजे काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, हायब्रिड मॉडेलमध्ये पाकिस्तानात खेळवल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 10 सामने आणि तर, याचा स्पर्धेतील 5 सामने हे दुसऱ्या देशात खेळवले जातील. या 5 सामन्यात उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्याचा समावेश आहे. पीसीबी आणि बीसीसीआय यांच्या वादातील तडजोड म्हणून हा मॉडेल अंमलात आणला जाऊ शकतो. पण जर भारतीय संघ हा अंतिम 4, उपांत्यफेरी आणि अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला नाही तर हे सामने पाकिस्तानमध्येच होऊ शकतात, असे यामध्ये सांगण्यात आले आहे. आयसीसीची ही योजना तणाव कमी करू शकते, पण यावेळी काही ऑपरेशनल आणि लॉजिस्टिक आव्हाने समोर उभी राहू शकतात. अशा परिस्थितीत आयसीसी पीसीबीला काही सवलत देऊ शकते.
तर यजमानपद काढून घेणार
आयसीसीच्या हायब्रिड मॉडेलला पाकिस्तानने सहमती दर्शवली नाही. तर, त्यांच्याकडून या स्पर्धेचे यजमानपद काढून घेण्यात येऊ शकते, असेदेखील आयसीसीकडून स्पष्ट केल्याचे कळते. असे घडल्यास ही स्पर्धा यूएईमध्येही जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. तर, दक्षिण आफ्रिकेचाही पर्याय हा आयसीसीकडे आहे. विशेष म्हणजे, आयसीसी बोर्डाच्या अने सदस्यांनी हायब्रिड मॉडेलला समर्थन दिल्याचे कळते. त्यामुळे, आगामी काळात याबद्दल मतदान घेऊन निर्णय घेतला जाऊ शकतो, असेदेखील सांगण्यात येत आहे. दरम्यान, आयसीसीने पाकिस्तान बोर्डाला ‘भारताशिवाय ही स्पर्धा होऊ शकत नाही.’ असे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आयसीसीचे मोठे नुकसान होऊ शकते, असेदेखील यावेळी सांगितले गेले. त्यामुळे आता पीसीबीसह पाकिस्तानचीसमोरही मोठा पेच उभा राहिला आहे.