नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद भूषविणारा पाकिस्तानचा संघ आता स्पर्धेबाहेर पडला आहे. अशामध्ये सर्वच स्थरावरून पाकिस्तानच्या संघावर टीका करण्यात येत आहे. स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करलेल्या पाकिस्तानच्या संघावर फक्त इतर संघाचेच नव्हे तर पाकिस्तानच्या संघातील माजी खेळाडूंनीही त्यांच्यावर टीका केली आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला न्यूझीलंडविरोधात पराभव पत्करावा लागला. तर, दुसऱ्या सामन्यात त्यांचा भारतीय संघाने पराभव केला. (Champions Trophy 2025 Pakistan Player Waseem Akram criticized Pakistan Team)
हेही वाचा : Congress : कॉंग्रेसमध्ये सारेच नेते, कार्यकर्त्यांची मात्र वानवा, काय म्हणाले शशी थरूर?
पाकिस्तान संघाच्या कामगिरीबाबत माजी क्रिकेटपटू वासिम अक्रमने हल्लाबोल केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यादरम्यान ब्रेकमध्ये पाकिस्तान संघाचे खेळाडू केळी खात होते. याबद्दल वासिम अक्रमने त्यांच्यावर टीका करत, “माकडेही इतकी केळी खात नाहीत,” असे विधान केले. सोशल मीडियावर त्याने केलेल्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. पाकिस्तान संघाची तुलना माकडांशी करून वासिम अक्रमने आपला राग व्यक्त केल्याची म्हटले गेले. विशेष म्हणजे, सोशल मीडियावर पाकिस्तानचा संघ ट्रोल होताना दिसत आहे.
रविवारी (23 फेब्रुवारी) भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईच्या मैदानावर सामना खेळवण्यात आला. भारतीय संघाने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. यावेळी विराट कोहलीने शेवटच्या चेंडूंवर शतक झळकावत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या सामान्यादरम्यान ड्रिंक्स ब्रेक झाल्यावर पाकिस्तानी खेळाडू केळी खात होते. याबद्दल अक्रम म्हणाला, “माकडेही इतकी केळी खात नाहीत.” दरम्यान, या पराभवानंतर पाकिस्तानच्या संघाला टीकेला सामोरे जावे लागले. अनेक माजी क्रिकेटपटूंनी संघाबद्दल वाईट गोष्टी बोलत निशाणा साधला आहे. असे असताना तुरुंगात असलेल्या पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इम्रान खान म्हणाला की, पाकिस्तानमधील क्रिकेट उद्ध्वस्त होईल. सध्या पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्हीही संघ स्पर्धेबाहेर पडले आहेत.