Homeक्रीडाChampions Trophy 2025 : प्रतीक्षा संपली! स्पर्धेचे वेळापत्रक आले समोर; भारत-पाकिस्तान सामना...

Champions Trophy 2025 : प्रतीक्षा संपली! स्पर्धेचे वेळापत्रक आले समोर; भारत-पाकिस्तान सामना कधी?

Subscribe

गेल्या काही काळापासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आयोजनावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी हायब्रिड मॉडेलला मान्यता दिल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज, मंगळवारी (24 डिसेंबर) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही काळापासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आयोजनावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी हायब्रिड मॉडेलला मान्यता दिल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज, मंगळवारी (24 डिसेंबर) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून अंतिम सामना 9 मार्चला खेळवण्यात येणार आहे. (Champions Trophy 2025 schedule announced know about India vs Pakistan match)

हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवण्यात येणारी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानशिवाय संयुक्त अरब अमिराती (UAE) करणार आहे. 19 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत आठ संघाचा असून 15 सामने खेळवण्यात येणार आहेत. भारतीय संघाचे ग्रुप स्टेजचे सर्व सामने दुबईत खेळवले जातील. तर, इतर संघांचे सामने पाकिस्तानातच खेळवले जातील. पाकिस्तानातील रावळपिंडी, लाहोर आणि कराची या मैदानांवर तीन गट सामने खेळवले जातील. यानंतर दुसऱ्या उपांत्य फेरीचे आयोजन लाहोरमध्ये होईल. जर भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नाही, तर लाहोर 9 मार्च रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येईल. पण भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यास स्पर्धेचा फायनल सामना दुबईत खेळवला जाईल. उपांत्य आणि अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस असणार आहे. तीन गट सामने आणि भारताचा समावेश असलेला पहिला उपांत्य सामना दुबईत खेळवला जाईल.

हेही वाचा – U19 T-20 WC : महिला विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; मुंबईकर खेळाडूकडे मोठी जबाबदारी

भारत आणि पाकिस्तान सामना कधी?

गतविजेता पाकिस्तान 19 फेब्रुवारीला कराची येथे न्यूझीलंडविरुद्ध स्पर्धेची सुरुवात करेल. पाकिस्तानचा शेवटचा साखळी सामना बांगलादेशविरुद्ध रावळपिंडी येथे 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबईत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त बांगलादेश आणि न्यूझीलंड अ गटात आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारत 20 फेब्रुवारीला बांगलादेशसोबत सामना खेळणार आहे. तर पाकिस्तानसोबत सामना खेळल्यानंतर भारतीय संघ 2 मार्चला न्यूझीलंडशी भिडणार आहे. हे सर्व सामने दुबईत होणार आहेत. तर दुसऱ्या गटात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.

उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी काय व्यवस्था?

दोन उपांत्य फेरीचे सामने 4 आणि 5 मार्च रोजी होणार असून यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. 9 मार्च रोजी होणाऱ्या अंतिम फेरीतही राखीव दिवसाची तरतूद असेल. पहिला उपांत्य सामना (जर भारत त्यात पोहोचला तर) UAE मध्ये खेळवला जाईल. जर भारत पात्र ठरला नाही तर हा सामना पाकिस्तानमध्येच होणार आहे. त्याचप्रमाणे अंतिम सामना लाहोरमध्ये होणार आहे. भारताने विजेतेपदापर्यंत मजल मारल्यास युएईमध्ये होणार आहे.

हेही वाचा – Crime : माजी क्रिकेटरच्या वडिलांनी 34 बनावट खात्यांमधून घातला 1.25 कोटींचा गंडा; आता 7 वर्षांची शिक्षा 

हायब्रीड मॉडेल 2024-2027 पर्यंत असेल लागू

यापूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सर्व सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील. आयसीसीच्या या निर्णयामुळे दोन्ही संघ कोणत्याही आयसीसी स्पर्धेत एकमेकांच्या देशाचा दौरा करणार नाहीत आणि दोन्ही संघांमधील सामने तटस्थ ठिकाणी खेळवले जातील, हे स्पष्ट झाले आहे. आयसीसीचा हा नियम 2024-2027 पर्यंत लागू राहील.


Edited By Rohit Patil