Tuesday, March 18, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाChampions Trophy 2025 : रोहितची टीम इंडिया ठरली चॅम्पियन, 12 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली

Champions Trophy 2025 : रोहितची टीम इंडिया ठरली चॅम्पियन, 12 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली

Subscribe

नवी दिल्ली : दुबईमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर 4 विकेट्सनी मात केली आहे. तसेच, अंतिम सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025वर आपले नाव कोरले. यावेळी कर्णधार रोहित शर्मासह श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप सिंग हे या विजयाचे शिल्पकार ठरले. यावेळी न्यूझीलंड भारतीय संघासमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य पार करताना मधल्या फळीची दमछाक झाली. पण, के. एल. राहुल आणि अक्षर पटेलच्या सयामी खेळीमुळे भारतीय संघाने विजय मिळवला. तसेच, तब्बल 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा एकदा भारताकडे आली आहे. तर, मागील 10 महिन्यातील ही दुसरी ट्रॉफी ठरली आहे. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने 29 जून 2024 मध्ये आयसीसी टी 20 ची ट्रॉफी जिंकली होती. (Champions Trophy 2025 Team India defeated NZ in final and won Trophy)

हेही वाचा : IND vs NZ : फिरकीसमोर किवी हतबल तरीही टीम इंडियासमोर 252 धावांचे आव्हान 

न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना 252 धावांचे लक्ष्य भारतीय संघासमोर ठेवले होते. याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी केली होती. त्याने 41 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्व केले. पहिल्या विकेटसाठी रोहित शर्माने शुभमन गिलच्या साथीने 105 धावांची भागीदारी केली. पण, शुभमन गिल हा 31 धावांवर बाद झाला. त्यानंतर लागोपाठ भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली एका धावेवर झटपट बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माने 76 धावांची खेळी केली आणि बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने संयमी खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अक्षर पटेलने 29 धावा केल्या. तर, त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याने 18 धावांची खेळी केली. दुसरीकडे के. एल. राहुलने एक बाजू संभाळत नाबाद 34 धावा केल्या आहेत. त्याची ही खेळी भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची ठरली. रवींद्र जडेजाने जिंकण्यासाठी 2 धावांची गरज असताना विजयी चौकार मारत इतिहास रचला.

दरम्यान, पहिल्यांदा नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा भारताच्या फिरकीने आपली कामगिरी चोख बजावली. भारताच्या फिरकी विभागाने चांगली कामगिरी करत धावांवर अंकुश ठेवला आणि न्यूझीलंडला 251 धावांवर रोखले. रचिन रवींद्र आणि विल यंगने किवी संघाला अर्धशतकी भागीदारी रचत चांगली सुरूवात केली. पण रोहित शर्माची रणनिती तसेच भारताच्या फिरकी गोलंदाजांनी संघाला सामन्यात परत आणले. न्यूझीलंडकडून रचिन रवींद्रने 37 धावा, डेरेन मिचेलने 63 धावा आणि ब्रेसवेलने 53 धावांची खेळी केली. तेच भारताकडून कुलदीप यादव आणि वरूण चक्रवर्तीने प्रत्येकी 2 विकेट्स तर रवींद्र जडेजा-मोहम्मद शमीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.