घरक्रीडाहॉकीतील बदल स्वागतार्ह - दिलीप तिर्की

हॉकीतील बदल स्वागतार्ह – दिलीप तिर्की

Subscribe

संक्षिप्त स्वरूपात असलेली हॉकी-५ लोकप्रियतेच्या मार्गावर असून जुनी पारंपरिक हॉकी टिकवण्यासाठी वेगवेगळे प्रकार अवलंबावे लागतील असे दिलीप तिर्की यांचे मत आहे.

उडिशाचे माजी खाजदार, ऑलिम्पिकमध्ये तीनदा भारताचे प्रतिनिधित्व करणारे हॉकीपटू, अर्जुन पुरस्कार विजेते, सुंदरगड हॉकीचे करतेकरविते पद्मश्री दिलीप तिर्की यांचे हॉकीशी नाते अतूट असून भूमिपुत्रांसाठी त्यांनी बरेच योगदान दिले आहे. वर्ल्ड कप हॉकी स्पर्धेदरम्यान तिर्की यांनी सध्याच्या हॉकीबाबत मांडलेली मते.
हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ. पण आता हॉकीत बरेच बदल होत आहेत. हॉकी-५ (५ खेळाडूंचा संघ) ही तिर्की यांची संकल्पना. संक्षिप्त स्वरूपात असलेली हॉकी-५ लोकप्रियतेच्या मार्गावर असून जुनी पारंपरिक हॉकी टिकवण्यासाठी वेगवेगळे प्रकार अवलंबावे लागतील असे तिर्की यांचे मत आहे.
सध्याची पारंपरिक (११ खेळाडूंचा संघ) हॉकी जोपासावीच लागेल कारण तो खेळाचा मुख्य प्रचार गाभा आहे. हॉकीचा सामना ७० मिनिटांचा असावा (सध्या ६० मिनिटांचा सामना असतो, १० मिनिटे कमी करण्यात आली आहेत) असे त्यांचे मत आहे. हॉकी-५ हा प्रकारदेखील खेळला गेला पाहिजे, जेणेकरून हॉकीचाच फायदा होईल असे त्यांना वाटते.
हॉकीच्या प्रगतीबाबत तिर्की खुश आहेत. गेल्या ८-१० वर्षांत हॉकीच्या नियमांत अनेक बदल झाले असून ते खेळाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी उपयुक्त ठरतील असे त्यांना वाटते. हॉकी स्टिक उंचावण्याची मुभा देण्यात आल्यामुळे खेळ अधिक गतिमान होत आहे. तसेच खेळाडूंची फिटनेसही आता वाढल्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावलाय. फिटनेसमधील सुधारणा तसेच नवे डावपेच, तंत्र यामुळे बचावपटू आणि मधल्या फळीतील खेळाडू (मिडफिल्डर) यांच्यातील सीमारेषा धूसर झाली आहे. फुलबॅक आणि मिडफिल्डर यांच्यात आता फारसा फरक राहिलेला नाही. आता हॉकीत अनेक बदल होत असून त्यामुळे हॉकी वेगवान, गतिमान होईल अशी आशा तिर्की यांनी व्यक्त केली.
तसेच उडिशामध्ये वर्ल्ड कप होत असल्याचा त्यांना आनंद आहे. उडिशामध्ये वर्ल्ड कप होत असल्याने भुवनेश्वरला उत्तम स्टेडियम लाभले. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले याचा तिर्की यांनी आवर्जून उल्लेख केला. सुंदरगडमध्ये हॉकी खूप लोकप्रिय आहे. तसेच रौरकेलामध्येही हॉकी सामन्यांसाठी चांगली गर्दी होते असे ते म्हणाले.
दिलीप तिर्की यांनी २०१० मध्ये हॉकीमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पण ते हॉकीला विसरले नाही. हॉकीमुळे मला खूप नावलौकिक मिळाला. भारतासाठी खेळलो, कर्णधारही झालो ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या खेळाने मला खूप काही दिले आहे. आता मी राजकारणाचाही आनंद घेतो आहे. राजकारणात मी काही नव्या गोष्टी शिकतोय आणि त्याचा आनंद उपभोगतोय असे तिर्की म्हणाले.
– शरद कद्रेकर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -