कश्यप, प्रणितची आगेकूच

चीन ओपन बॅडमिंटन

भारताचे बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप आणि साई प्रणितने चीन ओपन स्पर्धेची विजयी सुरुवात केली. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सायना नेहवालला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. आठव्या सीडेड सायनाला चीनच्या काय यान यानने २१-९, २१-१२ असे पराभूत केले. सायनाने यावर्षी जानेवारीमध्ये इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकली होती. परंतु, त्यानंतर सलग तीन स्पर्धांच्या पहिल्या फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला. मागील महिन्यात झालेल्या फ्रेंच ओपनची तिने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती, पण चीन ओपनमध्ये पुन्हा तिने निराशजनक कामगिरी केली.

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत पारुपल्ली कश्यपने थायलंडच्या थम्मासिनचा २१-१४, २१-१३ असा सरळ गेममध्ये पराभव केला. त्याचा दुसर्‍या फेरीत सातव्या सीडेड डेन्मार्कच्या व्हिक्टर अ‍ॅक्सेलसनशी सामना होईल. जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या साई प्रणितने इंडोनेशियाच्या टॉमी सुगीर्टोवर १५-२१, २१-१२, २१-१० अशी मात केली.

जागतिक क्रमवारीत अकराव्या स्थानी असणार्‍या प्रणितचा पुढील फेरीत डेन्मार्कच्या आंद्रेस अँटोन्सनशी सामना होईल. समीर वर्माला मात्र पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्याला हाँगकाँगच्या ली चेऊक यिऊने १८-२१, १८-२१ असे पराभूत केले. मिश्र दुहेरीत भारताच्या प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डीचेही आव्हान संपुष्टात आले.