क्रिस गेल, वॉर्नरपैकी जास्त विस्फोटक कोण?

 पंजाब, हैदराबाद संघात ट्विटर वॉर

करोनाच्या धोक्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायजर्स हैदराबाद या आयपीएल संघांमध्ये ’ट्विटर वॉर’ पाहायला मिळाले. पंजाबचा क्रिस गेल आणि हैदराबादचा डेविड वॉर्नर यांच्यात जास्त विस्फोटक फलंदाज कोण, असा प्रश्न आयपीएलचे प्रसारण करण्यार्‍या वाहिनीने ट्विटरवरुन प्रश्न विचारला.

याचे उत्तर देताना पंजाब संघाने ट्विटरवर लिहिले की, या दोघांपैकी एकाच्या (गेल) नावे आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके, सर्वोच्च धावसंख्या, आयपीएल इतिहासात सर्वात जलद शतक, सार्वधिक षटकार असे विक्रम आहेत. तसेच त्याने आपल्या धावा १५० हून अधिकच्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. त्यामुळे आमची पसंती कोणाला आहे, हे तुम्हाला ठाऊक असेलच. याला प्रत्युत्तर देताना वॉर्नरच्या हैदराबाद संघाने ट्विट केले की, या दोघांपैकी एकाने तीन वेळा ऑरेंज कॅप (एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज) जिंकली आहे आणि एकदा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे, हे पंजाब संघाला माहित असेलच.