IPL : क्रिस गेल पुढील आयपीएलमध्ये पहिल्या सामन्यापासून खेळेल – नेस वाडिया 

गेलने यंदा सात सामन्यांत २८८ धावा केल्या होत्या.  

chris gayle
क्रिस गेल

युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या तेराव्या मोसमात किंग्स इलेव्हन पंजाब संघाला प्ले-ऑफमध्ये प्रवेश करता आला नाही. लोकेश राहुलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाबने सुरुवातीचे सात पैकी सहा सामने गमावले होते. त्यानंतर त्यांनी सलग पाच सामने जिंकले, पण याचा त्यांना फारसा फायदा झाला नाही. पंजाबच्या सलग पाच विजयांमध्ये क्रिस गेलने महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेलला आयपीएलच्या पूर्वार्धात एकही सामना खेळायला मिळाला नाही. मात्र, त्यानंतर त्याने सात सामन्यांत ४१.१४ च्या सरासरीने २८८ धावा केल्याने गेलला सुरुवातीपासून संधी का मिळाली नाही? असा सवाल चाहत्यांनी उपस्थित केला. पुढील मोसमात मात्र गेल पहिल्या सामन्यापासून खेळेल याची पंजाबचे संघमालक नेस वाडिया यांना खात्री आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये गेलला सुरुवातीपासून सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. संघ व्यवस्थापनाला संघाच्या हितासाठी जे योग्य वाटले, ते त्यांनी केले. मात्र, अनुभवी खेळाडूंवर विश्वास दाखवणे गरजेचे असते. गेलने यंदाच्या मोसमात संधी मिळताच उत्कृष्ट कामगिरी करत पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले. त्यामुळे पुढील मोसमात त्याला पहिल्या सामन्यापासून संघात स्थान मिळेल याची मला खात्री आहे, असे वाडिया म्हणाले.

पंजाबच्या मधल्या फळीतील फलंदाजांना तितकीशी चांगली कामगिरी करता आली नाही. याबाबत वाडिया यांनी सांगितले, यंदा आमच्या संघाला राहुलच्या रूपात नवा कर्णधार लाभला. तसेच आमच्या संघात बरेच नवे खेळाडू होते. त्यामुळे संघ सातत्यपूर्ण खेळ करणार नाही हे अपेक्षितच होते. आता लवकरच खेळाडू लिलाव होणार आहे. या लिलावात आम्ही मधल्या फळीतील फलंदाज, तसेच गोलंदाज खरेदी करण्यावर लक्ष केंद्रित करू.