महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अहिल्यानगर येथे झालेल्या लढतीत स्पर्धेत विजेता घोषित करण्यात आला खरा, पण पंचाच्या निर्णयावर आक्षेत घेत पराभूतांनी गोंधळ घातला. गादी विभागातील अंतिम लढतीत पंचाच्या निर्णयानंतर पराभूत झालेल्या शिवराज राक्षे याने थेट पंचांना ‘लक्ष्य’ केले.
गादी गटातील अंतिम लढत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि नांदेडचा शिवराज राक्षेत यांच्यात झाली. पण, दोन मिनिटांत मोहोळने राक्षेवर पकड घेत त्याला चितपट केले. मात्र, पंचांच्या निर्णयाला राक्षेने आक्षेप घेतला. चितपट कुस्ती झाली नाही, कुस्तीचा रिप्ले पाहून निर्णय द्यावा, असे राक्षेचे म्हणणे होते. त्यासाठी तो केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडेही दादा मागण्यात गेले.
हेही वाचा : “शिवराजने पंचाला लाथ मारणे चुकीचे होते, त्याने खरेतर…”, चंद्रहार पाटील संतापले
पण, पंचांचा निर्णय कायम ठेवत राक्षेला पराभूत घोषित केले. त्याबाबत त्याने थेट पंचांकडे धाव घेत विचारणा केली. संतप्त राक्षेने पंचांची गचांडी पकडून लाथ मारली. त्यानंतर गोंधळ सुरू झाला. राक्षेला पराभूत घोषित करण्यावरून बराच वाद सुरू झाला असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आता शिवराज राक्षेचे प्रशिक्षक रणधीर पोंगल यांनी एक आव्हान दिले आहे.
“आंतरराष्ट्रीय संस्थांनी शिवराज राक्षेचा पराभव झाल्याचं मान्य केले, तर एक कोटींचे बक्षीस देईल. तसेच, काका पवार तालमीला बदनाम करण्याचे षडयंत्र काही लोक करत आहेत,” असा आरोप रणधीर पोंगल यांनी केला आहे.
शिवराज राक्षेचे बंधू युवराज राक्षे यांनी सुद्धा अनेक कुस्त्यांचे दाखले देत शिवराजच्या खेळ आणि स्वभाव सांगत पंचांनी दिलेला चुकीचा निर्णय आहे, असं म्हटलं आहे.
“शिवराज हा जवळ-जवळ16 वर्षांपासून कुस्ती खेळतोय. आजवरच्या त्याच्या कुस्तीच्या कारिकर्दीतले सर्व सामने अथवा त्याचे व्हिडिओ तपासून पाहा, विजयाने तो हुरळून जात नाही तर पराभवाने खचूनही जात नाही. खेळ म्हटला तर हार-जीत ही आलीच आणि पराभव स्वीकारण्याची त्याची ताकद देखील आहे. पराभव असता तर निर्णय मान्य आहे. पण, पराभव झाला नाही, तर मान्य कसे करणार? पंचाला लाथ मारली हे सर्वत्र दिसतंय. मात्र, त्यावेळी त्याला खालून शिवीगाळ झाल्यामुळे शिवराजने रागात हे पाऊल उचलले,” असं युवराज राक्षे यांनी सांगितले.
हेही वाचा : ‘हेंद्र्या तुला बोललो का? तुझा उद्योग बघ ना, तू काय…’ जरांगे-पाटील वडेट्टीवारांवर संतापले