घरक्रीडाभारतीय संघात पुनरागमनाचा विश्वास! - मनीष पांडे

भारतीय संघात पुनरागमनाचा विश्वास! – मनीष पांडे

Subscribe

मनीष पांडेला मागील काही काळात भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. मागील वर्षी आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार्‍या मनीषला दुखापतींनीही ग्रासले होते. भारतीय संघातील चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. मनीषने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध याच क्रमांकावर खेळताना शतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे चौथ्या क्रमांकाचा प्रश्न मिटला, असे भारतीय संघ व्यवस्थापनाला वाटले होते. मात्र, त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश आल्याने त्याला संघातून वगळण्यात आले.

परंतु, यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना मनीषने दमदार कामगिरी केली. त्याने चांगला फॉर्म सुरू ठेवत भारत ‘अ’ संघाकडून खेळताना वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्ध मंगळवारी झालेल्या सामन्यात शतक झळकावले. त्यातच त्याने फिटनेसवरही मेहनत घेतली आहे. त्यामुळे लवकरच त्याचे भारतीय संघात पुनरागमन होईल, असा त्याला विश्वास आहे.

- Advertisement -

यंदाच्या आयपीएलमध्ये सुरुवातीच्या काही सामन्यांत माझी कामगिरी निराशाजनक होती. मात्र, चेन्नईविरुद्ध जेव्हा मला पहिल्यांदा तिसर्‍या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा मी अर्धशतकी खेळी केली. यंदाच्या स्पर्धेतील तो माझ्यासाठी सर्वोत्तम क्षण होता, कारण त्यानंतर माझ्या कामगिरीत खूप सुधारणा झाली. त्या सामन्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि मी सातत्याने धावा करू लागलो, असे मनीष म्हणाला. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात तिसर्‍या क्रमांकावर खेळताना मनीषने ४९ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ८३ धावांची खेळी केली होती. मात्र, चेन्नईने शेन वॉटसनच्या ९६ धावांमुळे हा सामना जिंकला.

सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडिज ‘अ’ विरुद्धच्या मालिकेत मनीष भारत ‘अ’ संघाचे नेतृत्त्व करत आहे. ५ सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत भारताने ३-० अशी आघाडी मिळवली आहे. या मालिकेविषयी मनीष म्हणाला, मी मागील काही वर्षे भारत ‘अ’ संघाचे नेतृत्त्व करत आहे आणि आम्ही या काळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आता माझे फक्त जास्तीतजास्त धावा करण्याचे लक्ष्य आहे. भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी सातत्याने धावा करण्याशिवाय पर्याय नाही. मी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली. आता जर वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्ध मी दमदार प्रदर्शन करू शकलो तर माझे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकेल.

- Advertisement -

पुढील महिन्यात सुरू होणार्‍या वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी भारतीय संघाची शुक्रवारी निवड होणार आहे. शिखर धवन आणि विजय शंकर यांच्या फिटनेसवर प्रशचिन्ह असल्याने मनीषची एकदिवसीय संघात निवड होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -