मोदींच्या ‘क्रिकेट कुटनिती’वर काँग्रेसचा संताप; म्हणाले मोदींना ‘मी’ची बाधा

नवी दिल्ली : बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून अहमदाबाद येथे खेळण्यास सुरूवात झाली. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी स्टेडियममध्ये येऊन कार्यक्रमाचे राजकारण केले. सामन्यापूर्वी दोन्ही पंतप्रधानांनी खास गोल्फ कारमधून स्टेडियमचा फेरफटका मारला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून भाजपने याला सरकारची ‘क्रिकेट कुटनिती’ म्हटले आहे. दुसरीकडे विरोधक सरकारवर टीका करत आहेत.

अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या नावाच्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांना अभिवादन करत मैदानावर फेरी मारत ‘मी पणा’ करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत केली. या टीकेनंतर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी मोदी स्टेडियममधील कार्यक्रमाचा फोटो शेअर करत ‘क्रिकेट कुटनिती’ म्हटले आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी क्रिकेटपटूंचीही भेट घेतली. दोन्ही देशांचे राष्ट्रगीत सुरू असेपर्यंत दोन्ही पंतप्रधान स्टेडियममध्ये उपस्थित होते. दोन्ही पंतप्रधानांनी स्टेडियममधील हॉल ऑफ फेम म्युझियमलाही भेट दिली.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज बुधवारी संध्याकाळी अहमदाबादला पोहोचले. ते बुधवारी काही कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. अल्बानीज यांनी सांगितले की, त्यांचे सरकार आणि भारत सरकार ऑस्ट्रेलिया-भारत शैक्षणिक पात्रता ओळख यंत्रणेवर एकत्र काम करत आहेत. ऑस्ट्रेलियाची डीकिन युनिव्हर्सिटी गुजरातमधील गांधीनगर येथे आगामी गिफ्ट सिटीमध्ये स्वतःची शाखा उघडणार आहे. चीनच्या वाढत्या आव्हानामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जवळीक वाढली आहे. दोन्ही देश क्वाड संघटनेचाही भाग आहेत.