नाशकात टेबल टेनिस एक्सलन्स सेंटरसाठी सहकार्य

नामदेव शिरगावकर : ८३ व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेस प्रारंभ

जिल्हा टेबल टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे नवनिर्वाचित जनरल सेक्रेटरी व भारतीय ऑलम्पिक संघटनेचे सहसचिव नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र ऑलम्पिक संघटनेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष संजय शेटे, नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, राज्य टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजीव बोडस, वैभव जोशी, राधेशाम मुंदडा, उपाध्यक्ष डॉ. शिवाजी सरोदे, उपाध्यक्षा स्मिता बोडस, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव दयानंद कुमार, महाराष्ट्र पेंटाथलॉन असोसिएशनचे अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे, श्रीराम कोणकर, सुभाष देसाई, शेखर भंडारी, संजय मोडक, राजेश भरवीरकर, मिलिंद कचोळे, अभिषेक छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते. नरेंद्र छाजेड यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. याप्रसंगी स्पर्धेचे उद्घाटक शिरगावकर यांनी मनोगत व्यक्त करताना कोविडमुळे अत्यंत बिकट परिस्थिती असूनही सर्व नियमांच्या अधीन राहून राज्य स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल नाशिक जिल्हा व राज्य संघटनेचे अभिनंदन केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना व नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटना यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनकडे नाशिकला टेबल टेनिस एक्सलन्स सेंटर करण्यासाठी प्रस्ताव पाठवला तर सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही दिली. तसेच यासाठी नासिक जिमखान्याचा अद्यावत टेबल टेनिस संकुल एक्सलन्स सेंटरसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवल्याबद्दल नाशिक जिमखाना संस्थेचे आभार मानले.

याप्रसंगी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार्‍या नाशिकच्या सायली वाणी, तनिषा कोटेचा व प्रशिक्षक जय मोडक यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राजीव बोडस यांनी राज्य संघटनेच्या वतीने मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राजीव देशपांडे यांनी केले. तसेच नाशिक जिमखान्याच्या वतीने संस्थेचे सचिव राधेशाम मुंदडा यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मिलिंद कचोळे, अलका कुलकर्णी, अविनाश टिळे , जय मोडक, संजय कोटेचा, पीयूष चोपडा, सुहास आगरकर, राकेश पाटील, स्वाती आगरकर, हर्षल पवार आदी मान्यवर खेळाडू उपस्थित होते.