विराट-अनुष्काने मानले चाहत्यांचे आभार; कोरोना विरोधातील लढ्यासाठी ११ कोटींचा निधी जमा  

या दोघांनी मिळून केट्टो या क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून निधी जमा करण्याचा निर्णय घेतला होता.

virat kohli and anushka sharma
विराट-अनुष्काने मानले चाहत्यांचे आभार; कोरोना विरोधातील लढ्यासाठी ११ कोटींचा निधी जमा  

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी मागील आठवड्यात कोरोना विरोधातील लढ्यासाठी निधी जमा करण्यास एक उपक्रम सुरु केला होता. या दोघांनी मिळून केट्टो (ketto) या क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून निधी जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी स्वतः दोन कोटींची मदत करतानाच सर्व भारतीयांना पुढे येत आपल्या देशाला मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला भारतीयांनी चांगला प्रतिसाद दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून ११ कोटींचा निधी उभारण्यात आला. त्यामुळे या दोघांनी शुक्रवारी सोशल मीडियावरून चाहत्यांचे आभार मानले.

आपण सगळे एकत्र आहोत

आम्ही समोर ठेवलेले लक्ष्य एकदा नव्हे, तर दोनदा पार केले गेले आहे. आम्हाला आमच्या भावना सांगण्यासाठी शब्द कमी पडतील. मला देणगी देणाऱ्या सर्व लोकांचे आभार मानायचे आहेत. आपण या काळात सगळे एकत्र आहोत आणि आपण जिंकणार याची मला खात्री आहे, असे विराटने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले. त्यानंतर विराट आणि अनुष्काने एक व्हिडिओ पोस्ट करत पुन्हा सर्वांचे आभार मानले.

संपूर्ण निधी कोरोना विरोधातील लढ्यासाठी

कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी सुरुवातीला सात दिवसात सात कोटी रुपये जमवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. हे लक्ष्य आधीच पूर्ण झाल्याने त्यानंतर ११ कोटी इतका निधी जमा करण्याचे नवे लक्ष्य विराट आणि अनुष्काने डोळ्यासमोर ठेवले होते. आता हे लक्ष्यही पूर्ण झाले आहे. हा संपूर्ण निधी कोरोना विरोधातील लढ्यात वापरण्यात येणार असल्याचे या दोघांनी स्पष्ट केले.