घरक्रीडाIND vs ENG : भारताने हवी तशी खेळपट्टी तयार केली, तर त्यात गैर...

IND vs ENG : भारताने हवी तशी खेळपट्टी तयार केली, तर त्यात गैर काय?

Subscribe

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने टीकाकारांना प्रश्न उपस्थित केला.  

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अहमदाबाद येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याला बुधवारपासून सुरुवात होत आहे. असे असले तरी अजूनही चेन्नई येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील खेळपट्टीबाबत चर्चा होत आहे. या कसोटी मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये झाले. इंग्लंडने पहिली कसोटी जिंकल्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटीत दमदार पुनरागमन केले. मात्र, भारताच्या या विजयापेक्षा चेन्नईच्या खेळपट्टीबाबत अधिक चर्चा झाली. या खेळपट्टीवर फिरकीपटूंना पहिल्या दिवसापासून मदत मिळत असल्याने इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनसह अनेकांनी या खेळपट्टीवर टीका केली. परंतु, ही गोष्ट भारताचा सलामीवीर रोहित शर्माला फारशी आवडली नाही.

आम्ही तक्रार करत नाही

खेळपट्टीबाबत इतकी चर्चा का होते हेच मला कळत नाही, असे रोहित म्हणाला. आम्ही परदेशात खेळतो, तेव्हा आम्हाला अनुकूल खेळपट्ट्या बनवल्या जात नाहीत. मात्र, आम्ही खेळपट्टीबाबत कधीही तक्रार करत नाही. खेळपट्टी कशीही असो, आम्ही ते आव्हान स्वीकारतो आणि चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे लोकांनी आणि खासकरून क्रिकेट समीक्षकांनी खेळपट्टीबाबत चर्चा करण्यापेक्षा क्रिकेटवर चर्चा केली पाहिजे, असे रोहितने स्पष्ट केले.

- Advertisement -

खेळपट्ट्यांबाबत चर्चा थांबवा

भारतात पूर्वीपासूनच अशाप्रकारच्या खेळपट्ट्या बनवल्या जातात. प्रत्येक संघ घरच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. मग भारताने घरच्या मैदानावर खेळताना हवी तशी खेळपट्टी तयार केली, तर त्यात गैर काय? दोन्ही संघांना खेळपट्टी सारखीच असते. त्यामुळे समीक्षकांनी खेळपट्ट्यांबाबत चर्चा करणे थांबवले पाहिजे. त्यांनी क्रिकेट आणि खेळाडूंबाबत चर्चा करावी, असेही रोहित म्हणाला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -