Shoaib akhtar : रावलपिंडी एक्सप्रेस यार्डात ! आता कधीच धावू शकणार नाही, शोएब अख्तरने सांगितले कारण

क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने सांगितले आहे की त्याचे धावायचे दिवस संपले आहेत. कारण पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू गुडघ्याच्या दुखापतीमुळे ग्रस्त असल्यामुळे तो सर्जरी करण्यासाठी जाणार आहे. सतत वेगवेगळ्या अंदाजात गोलंदाजी करणाऱ्या अख्तरचे करियर सतत दुखापतीमुळे ग्रस्त राहिले आहे. अशातच क्रिकेट सोडल्यानंतर देखील त्याला या दुखापतीचा सामना करावा लागत आहे. २ वर्षांपूर्वी शोएब अख्तरने ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये गुडघ्याच्या दुखापतीवर सर्जरी केली होती. अख्तरने ट्विटरच्या माध्यमातून त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे, त्या फोटोमध्ये तो शारीरीक व्यायाम करून आल्याचे दिसते आहे. दरम्यान या फोटोत शोएबच्या चेहऱ्यावर खूप थकवा जाणवत आहे.

रावलपिंडी नावाने प्रसिध्द असलेला शोएब अख्तर यापुढे धावू शकणार नाही अशी माहिती त्याने ट्विट करून दिली. शोएबने ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, “माझे धावण्याचे दिवस संपले आहेत. कारण मी लवकरच मेलबर्नला गुडघ्याच्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी जाणार आहे”. तर अख्तरने ही पोस्ट इंस्टाग्रामवर देखील पोस्ट केली आहे. २०११ मध्ये शोएब अख्तरने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून संन्यास घेतला होता त्यानंतर तो समालोचक आणि क्रिकेट विश्लेषक म्हणून काम पाहत होता.

अख्तरने पाकिस्तानच्या संघासाठी ४६ कसोटी आणि १६३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे १७८ आणि २४७ बळी पटकावले आहेत. त्याने १९ टी-२० आंतरराष्ट्रीय बळी १५ सामन्यांत घेतले आहेत. शोएब अख्तरने त्याचा शेवटचा सामना न्यूझीलंडविरूध्द २०११ मध्ये खेळला होता. त्या सामन्यात त्याला एक बळी मिळाला होता. लक्षणीय बाब म्हणजे सर्वात वेगाने चेंडू टाकण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर आहे. शोएबने १६१.३ प्रति ताशी वेगाने सर्वात वेगवान चेंडू टाकला होता.


हे ही वाचा: BAN vs PAK : शोएब मलिकची बांगलादेश दौऱ्यातून माघार, कारण…