Gautam gambhir : “तुमच्या मुलाला आणि मुलीला सीमेवर पाठवा, मग बोला; सिद्धूंवर गंभीर भडकले

माजी क्रिकेटर आणि कॉंग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत

माजी क्रिकेटर आणि कॉंग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नवज्योत सिंग सिद्धू यांनी काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आपले मोठे भाऊ असल्याचे म्हटले होते. दरम्यान सिद्धू यांच्या याच वक्तव्यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. माजी क्रिकेटर आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर यांनी या वादात उडी घेत आक्रमक शब्दांत भाष्य केले आहे. गंभीर यांनी शनिवारी सायंकाळी ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, “आपल्या मुलाला किंवा मुलीला बॉर्डर पाठवा आणि तेव्हाच कोणत्या आंतकवादी देशाच्या प्रमुखाला आपला मोठा भाऊ म्हणा”. गंभीर यांनी अशा शब्दांत सिद्धू यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

लक्षणीय बाब म्हणजे गंभीर यांनी आपल्या ट्विटमध्ये कोणाच्या नावाचा उल्लेख केला नाही. मात्र हे स्पष्ट आहे की त्यांचा निशाना कॉंग्रेस पक्षाचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वादात ज्या तीन जणांची नावे समोर येत आहेत त्या तीनही राजकारण्यांना माजी दिग्गज क्रिकेटर म्हणून जास्त ओळखले जाते. इमरान खान पाकिस्तानचे माजी कर्णधार आहेत आणि त्यांनी त्यांच्या देशाला विश्वकप देखील जिंकून दिला आहे.
तर नवज्योत सिंग सिद्धू हे देखील माजी क्रिकेटर आहेत. सध्या ते राजकारणात सक्रिय आहेत. गौतम गंभीर पण २०११ विश्वचषकाच्या विजयातील हिरो आहेत. त्यांनी देखील राजकारणात प्रवेश केला आणि आता ते दिल्ली भाजपकडून खासदार आहेत.

पंजाबमध्ये पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. नवज्योत सिंग सिद्धू पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत. पण ते सुरूवातीपासूनच वादग्रस्त विधानाने चर्चेत राहिले आहेत. त्याच कारणामुळे सिद्धूंच्या वक्तव्यावर एवढा वाद वाढला आहे. हा वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा नवज्योत सिंग सिद्धू कर्तारपूर सीमेवर पोहोचले तेव्हा त्यांचे स्वागत करण्यात आले. यादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान माझे मोठे भाऊ आहेत, त्यांनी मला खूप प्रेम दिले असे नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले होते.


हे ही वाचा: Indonesia Masters 2021: पी.व्ही सिंधूनंतर किदाम्बी श्रीकांतचा पण उपांत्य फेरीत पराभव; भारताचे आव्हान संपुष्टात