Syed Mushtaq Ali Trophy Final : शाहरूख खानचा सिक्सर, तामिळनाडूने पटकावले विजेतेपद; कर्नाटकचा केला पराभव

तामिळनाडूने सलग दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा किताब जिंकला आहे

तामिळनाडूने सलग दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा किताब जिंकला आहे. सोमवारी दिल्लीमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत तामिळनाडूने कर्नाटकचा ४ गडी राखून पराभव केला. तामिळनाडूच्या विजयात शाहरूख खानची महत्त्वाची भूमिका राहिली, त्याने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. शाहरूखने १५ चेंडूत ३ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद ३३ धावांची खेळी केली. सामन्याच्या शेवटच्या षटकांत तामिळनाडूच्या संघाला विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होती.

शेवटच्या षटकारातील पहिल्याच चेंडूवर साई किशोरने चौकार मारून दुसऱ्या चेंडूवर एक धाव काढली. यानंतर पुढचा चेंडू गोलंदाज प्रतीक जैनने वाइड टाकला. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर फलंदाजांनी अनुक्रमे १-१ धाव काढली. नंतर गोलंदाजांने आणखी एक चेंडू वाइड टाकला. दरम्यान तामिळनाडूला विजयासाठी २ चेंडूत ७ धावांची गरज होती. पाचव्या चेंडूवर शाहरूख खानने २ धावा काढल्या, शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावांची गरज असताना शाहरूख खानने षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.

जगदीशन-निशांत यांचे महत्त्वाचे योगदान

१५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तामिळनाडूचे सलामीवीर सी हरी निशांतने चांगली सुरूवात केली. निशांतने १२ चेंडूत २ षटकार आणि एक चौकार मारून २३ धावा केल्या. तर दुसरा सलामीवीर एन. जगदीशनने ४१ धावांची खेळी करून संघाच्या विजयात हातभार लावला. दरम्यान संघाच्या ९५ धावांवर निशांत आणि कर्णधार विजय शंकर (१८) बाद झाल्यानंतर तामिळनाडूच्या अडचणीत वाढ झाली होती. मात्र शाहरूख खानने निसटता विजय खेचून आणून संघाला विजय मिळवून दिला.

कर्नाटकने १५२ धावांचे दिले होते आव्हान

नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्नाटकच्या संघाने २० षटकांत ७ बाद १५१ धावा केल्या होत्या. अभिनव मनोहर (४६) आणि प्रवीण दुबेने (३३) धावांची खेळी केली. तसेच मनीष पांडे (१३) आणि करूण नायर (१८) धावांची खेळी केली. कर्नाटक कडून निराशाजनक फलंदाजी झाली. तामिळनाडूकडून साई किशोरने सर्वाधिक बळी पटकावले.

तामिळनाडूच्या संघाने तिसऱ्यांदा हा किताब जिंकला आहे. तामिळनाडूने या स्पर्धेच्या पदार्पणाच्या हंगामाचे देखील विजेतेपद पटकावले होते. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत तामिळनाडूचा संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. 2019-20 च्या हंगामात कर्नाटकने तामिळनाडूचा अंतिम फेरीत पराभव केला होता.


हे ही वाचा: wrestling : बजरंग पुनिया आणि रवी दहियाला लवकरच विदेशी कोचची साथ