घरक्रीडात्रिदेव

त्रिदेव

Subscribe

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली ही त्रिमूर्ती सध्या गाजत असून वर्ल्डकप दरम्यान त्यांचाच सर्वत्र बोलबाला राहील अशी चिन्ह आहेत. वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होण्याआधी भारत ’फेव्हरिट’ असल्याची चर्चा होती. रोहितने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतकी खेळी करुन शानदार सलामी दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हलवर शिखर धवनने शतकी मजल मारली. विराट कोहलीने संघनायकाला साजेसा खेळ करत भारताचे त्रिशतक फलकावर झळकावले. या तीन शिलेदारांमुळे गेल्या 4-5 वर्षांत भारतीय संघ धावांचे इमले उभारत आहे.

केवळ धावांच्या राशी उभाारण्यात नवलाई नाही. व्यावसायिक बाणा दाखवत प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर प्रतिहल्ला करण्याचे त्यांचे तंत्रही वाखाणण्याजोगेच. सलामीच्याा लढतीत रबाडा, माॉरिस या दक्षिण आफ्रिकन तेज जोडगोळीचा नेटाने मुकाबला करुन डावाची छान उभारणी करण्याचे तंत्र रोहितने दाखवले. गतवेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियन आक्रमणासमोर प्रथम बचावात्मक पवित्रा घेत रोहित आणि शिखर यांनी भक्कम पायाभरणी केल्यावर कोहली, पांड्या, धोनी यांनी त्यावर कळस चढवण्याची कामगिरी चोखपणे पार पाडली. मिचेल स्टार्कच्या 10 षटकांत 74 धावा तडकावण्यात आल्या. पॅट कमिन्स, नेथन कुल्टर-नाईल या तेज गोलंदाजांची तमा न बाळगता धावांची लयलूट केली.

- Advertisement -

ओव्हल आणि शिखर धवनचे अतूट नाते आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये शिखरने 6 शतके इंग्लंडमध्ये (चॅम्पियन्स ट्रॉफी, वर्ल्डकप) झळकावली असून त्यापैकी तीन तर ओव्हलवरच! रोहित शर्मा-शिखर धवन यांनी 127 धावांची सलामी दिली. वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची ही एकमेव शतकी सलामी. या दोघांनी आतापर्यंत 60 च्या सरासरीने 1273 धावा कांगारुंविरुद्ध फटकावताना ग्रिनीज-हेन्स या विंडीजच्या बिनीच्या जोडीला मागे टाकले. भेदक, घातक असा ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा लौकिक असूनदेखील रोहित-शिखर यांनी सातत्यपूर्ण खेळ करुन आपला ठसा उमटविला आहे. इंग्लंडमध्ये वनडेत सर्वात जलद हजार धावांचा टप्पा ओलांडताना शिखरने व्हीव रिचर्डसला मागे टाकले.

शिखरने शतकी मजल मारली, परंतु सुरुवतीला कमिन्सने त्याला खूप सतावले. धवनने धावा केल्या, पण त्याचे तंत्र तितकेसे भक्कम नाही. त्याच्या जिगरबाज खेळाला दाद द्यावीच लागेल. सुरुवातीला चाचपडणार्‍या धवनने कमिन्सलाच कव्हर्समधून सीमापार धाडले, तेदेखील पायांची बिलकुल हालचाल न करता. कमिन्सच्या आखूड टप्प्याच्या चेंडूनी त्याची सत्वपरिक्षाच घेतली, पण आपल्या चुकांचा तो जास्त विचार करत नाही. गब्बरची बातच और! कट आणि पूलवर त्याचा अधिक भर असतो. ओव्हलवरील शतकी खेळीदरम्यान त्याने एकेरी, दुहेरी धावांवर अधिक लक्ष केंद्रित केले. खराब चेंडूचा खपूस समाचार घेत त्याने 16 चौकारही लगावले.

- Advertisement -

कर्णधार कोहलीने संयमी खेळ करताना दुय्यम भूमिका स्वीकारली. त्याच्या साथीत डावखुर्‍या धवनचा खेळ बहरला. हार्दिक पांड्याला चौथ्या क्रमांकावर बढती देण्याची कर्णधार कोहलीची चाल विलक्षण यशस्वी ठरली. यष्टीरक्षक कॅरीकडून मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवून कोहलीने अर्धशतक झळकावलेच. पांडयाबरोबर झटपट अर्धशतकी भागी रचून भारताला 350 धावांचा टप्पाही गाठून दिला. कांगारुंचे डावपेच त्यांच्यावरच उलटविण्यात कोहली-शास्त्री जोडगोळी यशस्वी ठरली.

मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका गमावल्यामुळे त्याची भरपाई करण्याची संधी मिळताक्षणीच त्यांनी ती सुरुवातीलाच साधली, ती देखील वर्ल्डकपसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत. सलामीच्या दोन्ही लढती भारताने जिंंकल्या असून त्यांची यशस्वी वाटचाल पुढे चालू राहण्याचे संकेत मिळत आहेतमी, ही भारतीय क्रिकेटसाठी आल्हाददायक बाब!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -