घरक्रीडाकॅप्टन मार्वलस

कॅप्टन मार्वलस

Subscribe

शनिवारी इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव करत पाच सामन्यांतील आपला चौथा विजय प्राप्त केला. या सामन्यात त्यांचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने १३२ चेंडूत १५३ धावांची ‘मॅचविनींग’ खेळी केली. या धावांमुळे तो या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने आतापर्यंत या स्पर्धेच्या ५ सामन्यांत ६८.६० च्या सरासरीने १ शतक आणि २ अर्धशतकांच्या जोरावर ३४३ धावा केल्या आहेत. याच कर्णधार फिंचचे वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियन संघातील स्थान धोक्यात आले होते. मात्र, या स्पर्धेत दमदार कामगिरी करत त्याने टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत.

मागील वर्षी मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध न्यूलँडस्, केपटाऊन येथे झालेल्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग केल्यामुळे तेव्हाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेविड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली. त्यानंतरच्या कठीण काळात ऑस्ट्रेलियाला एका खमक्या कर्णधाराची गरज होती. सुरुवातीला निवड समितीने यष्टीरक्षक टीम पेनवर विश्वास दाखवला. मात्र, त्याला आणि त्याच्या नेतृत्त्वात संघाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आल्याने निवड समितीने फिंचच्या मजबूत खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. याआधी ऑस्ट्रेलियन स्थानिक क्रिकेट, बिग बॅश लीग, आयपीएलमध्ये विविध संघांचे कर्णधारपद भूषवलेल्या फिंचला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून फारसा अनुभव नव्हता. त्याने त्याआधी काही टी-२० सामने आणि केवळ २ एकदिवसीय सामन्यांत कांगारूंचे नेतृत्त्व केले होते, परंतु स्मिथ, वॉर्नरसारखे दोन मुख्य फलंदाज संघात नसल्याने त्याच्या नेतृत्त्व कौशल्याची खरी कसोटी लागणार होती.

- Advertisement -

२०१८ च्या अखेरीस फिंचच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर झालेली मालिका २-१ अशी गमावली. त्यानंतर २०१९ मधील पहिल्या एकदिवसीय मालिकेत भारताने फिंचच्या ऑस्ट्रेलियाचा त्यांच्या घरच्या मैदानावर २-१ असा पराभव केला. त्यातच फिंचला या दोन मालिकांच्या ६ सामन्यांत मिळून केवळ (५७+२६) ८३ धावाच करता आल्या. यादरम्यान त्याला कसोटी क्रिकेटमध्येही संधी मिळाली. मात्र, त्यातही त्याची कामगिरी निराशाजनक होती. त्यामुळे संघातील त्याच्या स्थानाबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, ऑस्ट्रेलियन निवड समिती आणि प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी फिंचवर विश्वास दाखवत त्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला. त्याने या संधीचा चांगला वापर करत भारतामध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेच्या ५ सामन्यांत १५७ आणि पाकिस्तानविरुद्ध ५ सामन्यांत २ शतकांच्या मदतीने ४५१ धावा फटकावल्या. त्याच्या या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने या दोन्ही मालिका जिंकल्या. त्यामुळे वर्ल्डकपसाठी माजी कर्णधार स्मिथ आणि वॉर्नर यांचे पुनरागमन झाल्यावरही फिंचलाच कर्णधारपदी कायम ठेवण्यात आले.

त्याच्या नेतृत्त्वात गतविजेत्या कांगारूंनी या वर्ल्डकपची दमदार सुरुवात केली आहे. त्यांनी या स्पर्धेत अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका या आशियाई त्रिकुटासह जेसन होल्डरच्या विंडीजचाही पराभव केला आहे. भारताविरुद्ध मात्र त्यांना चांगले प्रदर्शन करण्यात अपयश आले आणि त्यांचा पराभव झाला. विंडीज (६) वगळता फिंचने इतर संघांविरुद्ध किमान ३६ धावा केल्या आहेत. त्याने आणि त्याचा सलामीचा साथीदार वॉर्नरने या स्पर्धेत ४ वेळा किमान अर्धशतकी भागीदारी केली आहे. त्यामुळे आगामी सामन्यांतही कर्णधार फिंचने आपला मॅचविनिंग फॉर्म कायम ठेवला, तर ऑस्ट्रेलिया या वर्ल्डकपमध्येही उत्कृष्ट कामगिरी करेल यात शंका नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -